पुणे: पुणे विमानतळावरून गुवाहाटीच्या दिशेने झेपावलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात उड्डाणानंतर काही वेळांतच तांत्रिक बिघाड झाला अन् त्याचे ‘लँडिंग गिअर’ अडकले. यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, वैमानिकाचे प्रसंगावधान आणि विमानतळ प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. या विमानात प्रवासी आणि क्रू सदस्यांसह एकूण १९२ जण होते, सुदैवाने सर्व जण सुखरूप आहेत.
इंडिगोचे फ्लाइट क्रमांक 6 ई 0623 (व्हीटी-आयझेडई) हे विमान १९२ प्रवाशांना घेऊन पुण्याहून गुवाहाटीला निघाले होते. उड्डाण घेतल्यानंतर विमानाचे लँडिंग गिअर (चाके) आत घेतले जात नसून ते बाहेरच अडकून राहिल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. वैमानिकाने तत्काळ याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) दिली. माहिती मिळताच पुणे विमानतळ प्रशासनाने एटीसी, इंडिगो आणि सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने संपर्क साधला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय वायुसेनेने विमानतळावर ‘फुल इमर्जन्सी’ (पूर्ण आणीबाणी) घोषित केली. यानंतर अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकांना धावपट्टीवर सज्ज ठेवण्यात आले. विमानाची चाके नेमकी कोणत्या स्थितीत आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी विमानाने धावपट्टीवरून अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण (लो पास) केले.
सर्व बाबींची खात्री केल्यानंतर रविवारी (दि.१५) सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी हे विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. लँडिंगनंतर तीन अग्निशमन दलाच्या गाड्या आणि दोन रुग्णवाहिकांच्या संरक्षणात विमानाला ‘वे क्रमांक ७’ वर नेण्यात आले.
विमान पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी आणीबाणी मागे घेण्यात आली. त्यानंतर एरोब्रिज जोडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या विमानाच्या पुढील प्रवासाकरिता पर्यायी विमानाची व्यवस्था तातडीने करण्यात आल्याची माहिती इंडिगाोने आपल्या अधिकृत निवेदनाद्वारे दिली.