IndiGo IndiGo file photo
पुणे

IndiGo Pune Flight: टेकऑफनंतर इंडिगोच्या विमानाचे लँडिंग गिअर अडकले; पुणे विमानतळावर खळबळ, आणीबाणी घोषित; नेमकं काय घडलं?

पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. इंडिगोच्या 6E 0623 (VT-IZE) या विमानाचे लँडिंग गिअर टेकऑफनंतर आत न गेल्याने एकच खळबळ उडाली.

मोहन कारंडे

IndiGo Flight Emergency Landing

पुणे : पुण्याहून गुवाहाटीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. इंडिगोच्या 6E 0623 (VT-IZE) या विमानाचे लँडिंग गिअर टेकऑफनंतर आत न गेल्याने एकच खळबळ उडाली. विमानाचे लँडिंग गिअर बाहेरच राहिल्याची माहिती वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) दिली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विमानतळावर पूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली.

विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह एकूण १९२ जण होते. घटनेची माहिती मिळताच पुणे विमानतळ प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या होत्या.

लँडिंग गिअरची स्थिती तपासण्यासाठी विमानाने धावपट्टीवरून लो-पास घेतला. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी विमानाचे पुणे विमानतळावर सुरक्षितरीत्या लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी आणीबाणी मागे घेण्यात आली.

एरोब्रिज जोडून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले. विमानातील १९२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांना गुवाहाटीला पोहोचवण्यासाठी इंडिगोकडून बंगळूरहून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे विमानतळ प्रशासन, भारतीय हवाई दल, एटीसी आणि इंडिगो यांच्या समन्वयातून मोठी आपत्कालीन मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. लँडिंग गिअरमधील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT