पुणे: देशातील संरक्षण साहित्याचे उत्पादन एक लाख ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचले असून, त्यामध्ये खासगी क्षेत्राचा वाटा सुमारे २५ टक्के इतका आहे. 'आत्मनिर्भर भारत' अभियानामुळे स्फोटके आणि दारूगोळा निर्मिती क्षेत्रात खासगी उद्योग, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा (एमएसएमई) सहभाग वेगाने वाढत आहे.
सध्या स्फोटके आणि प्रोपेलंट निर्मितीसाठी १५० हून अधिक कंपन्या परवाना प्रक्रियेत आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजीव कुमार आणि संरक्षण गुणवत्ता आश्वासन महासंचालनालयाचे (डीजीक्यूए) महासंचालक एन. मनोहरण यांनी दिली.
पुण्यात 'डीजीक्यूए'तर्फे आयोजित एका चर्चासत्रानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर, भंडारा आणि इतर ठिकाणी घडलेल्या स्फोटक कारखान्यांतील दुर्घटनांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजीव कुमार म्हणाले, ''सुरक्षेच्या बाबतीत सरकारी आणि खासगी उद्योगांसाठी वेगवेगळे नियम नाहीत.
सीएफईईएस आणि पीईएसओ यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन्ही क्षेत्रांतील उद्योगांना समान सुरक्षा निकष लागू आहेत. सरकारी दारूगोळा कारखान्यांमध्ये घडलेल्या अपघातांनंतर स्वतंत्र सुरक्षा सुधारणा आराखडा राबविण्यात येत असून, संरक्षण उत्पादन विभाग त्यावर सातत्याने देखरेख ठेवत आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम उत्पादन व्यवस्था उभारण्यावरही भर दिला जात आहे.असेही त्यांनी सांगितले.