भिगवण: इंदापुर तालुक्यात मतदार यादीतून कायम स्थलांतर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा हरकती अर्जाबाबत मोठा सावळा गोंधळ उडाला आहे. अनेक अर्जदारांनी सुनावणीत आपण हरकती अर्जच दाखल केला नसून, आपल्या नावाचा गैरवापर केल्याचे लेखी जबाब तहसील कार्यालयाला दिले आहेत. खुद्द हरकती घेणारा अर्जदार तो मी
नव्हेच, म्हणत असेल तर अर्जदारांच्या नावाने अर्ज करणारे अज्ञात कोण, असा गंभीर प्रश्न तालुक्यात निर्माण झाला आहे.
भिगवण गावातही असाच प्रकार उघडकीस आला असून, मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्राप्त अर्ज रद्द करून सुनावणी रद्द करण्याबाबत जबाब देण्यात आले आहेत. आपल्याकडून दुसऱ्याच कामासाठी आधार कार्ड घेऊन व सहीच नमुना मागून घेऊन आपल्या नावाचा गैरवापर या मतदार यादीतून नावे वागळण्याच्या अर्जासाठी करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
एसआरआय अर्थात मतदार यादी प्रक्रियेत बाहेरगावी असणारे मतदार यादीतून वगळण्याच्या सावळा गोंधळ तालुक्यात गावोगावी पसरल्याचे उदाहरणे पुढे येऊ लागली आहेत. काही ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाल्या आहेत.
यामध्ये देखील आमचा वापर झाल्याचे खुद्द तक्रारदार सांगताना दिसत आहेत. ही बाब अतिशय गंभीर मानली जात असुन, अर्जदारांच्या नावे तक्रार करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापुर तालुक्यासह भिगवणमधील काही स्थानिक नागरिक नोकरी, व्यवसाय किंवा इतर अन्य कारणांमुळे बाहेरगावी ये-जा करतात. काही नागरिक कामानिमित्त काही काळ गावाबाहेर असतात. अशा नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत, या मागणीसाठी काही अर्ज तहसील कार्यालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे, हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयाकडून सुनावणीची तारीख दिल्यानंतर ही बोगसगिरी उघड झाली आहे.
त्यामुळे अनेक तक्रादारांनी आपण असा कोणताही अर्ज केलेला नाही किंवा आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही, असे सांगत तसे लेखी जबाब तहसील कार्यालयाला दिले आहेत. या प्रकारामुळे अर्जदारांच्या नावे तक्रार देणारे अज्ञात आहेत तरी किती व कोण याचा तपास लागणे गरजेचे बनले आहे.
याबाबत भिगवण येथील प्रतीक गायकवाड व अभिजित बिबे यांनी देखील तसा लेखी जबाब तर दिला आहे, शिवाय ज्यांनी आपल्या नावाचा गैरवापर करून अर्ज दाखल केले आहेत, त्यांचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले आहे.