

प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर: 'कोल्हापूर पॅटर्न'प्रमाणे सातारा, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल जाहीर केल्याने आता बारामती तालुक्यातील 'माळेगाव'सह 'सोमेश्वर' कारखान्याच्या पहिल्या उचलीविषयी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांत प्रचंड उत्सुकता आहे.
बारामती तालुक्याच्या अगदी उंबरठ्यावर असलेल्या शेजारील फलटण तालुक्यातील कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तब्बल ३९०० ते ३९११ रुपयांपर्यंत पहिली उचल देण्याचे धाडस दाखवले आहे.
फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखाना ३८०० रुपये, दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ३९१० रुपये, शरयू साखर कारखाना ३९१० रुपये आणि स्वराज साखर कारखाना ३९११ रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केली आहे.
साखर पट्ट्याचे नेतृत्व करणाऱ्या बारामती तालुक्यातील साखर कारखान्यांनी मात्र अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे पहिल्या उचलीची चर्चा या भागात रंगली आहे.
शेजारील फलटण तालुक्यातील कारखाने, ज्यांची भौगोलिक परिस्थिती आणि उसाचा उतारा बारामतीच्या बरोबरीचाच आहे, ते कारखाने ३९०० ते ३९११ रुपये दर देऊ शकतात; मग बारामतीतील 'माळेगाव', सोमेश्वर यांसारख्या बलाढ्य आणि नावाजलेल्या साखर कारखान्यांना दर जाहीर करायला नेमकी कशाची भीती वाटत आहे? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
रासायनिक खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीचे दर गगनाला भिडले असताना, ३९०० रुपयांपेक्षा कमी दर मिळणे शेतकऱ्यांना आजिबात परवडणारे नाही.बारामतीतील कारखान्यांचा साखर उतारा चांगला असताना आणि इथेनॉल, वीज निर्मिती, डिस्टिलरी या उपपदार्थांतून कारखान्यांना कोट्यवधींचा नफा होत असताना, शेतकऱ्यांच्या घामाचे दाम देण्यास टाळाटाळ का केली जात आहे? असं सवाल जाणकार करत आहेत.
कोल्हापूर, सातारा, सांगली आणि आता फलटणने ३९०० चा टप्पा पार केल्यानंतर बारामतीतील कारखान्यांना त्यापेक्षा कमी दर जाहीर करणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.
जर बारामतीतील कारखान्यांनी ३९०० किंवा त्यापेक्षा जास्त पहिली उचल जाहीर केली नाही, तर तालुक्यातील ऊस पळवून नेला जाण्याची तसेच उसाअभावी गाळप कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जाण्याची वेळ कारखानदारांवर येऊ शकते.
प्रतिष्ठा राखणार का?
शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी बारामतीतील कारखान्यांचे संचालक मंडळ आता नेमका काय निर्णय घेते आणि ३९०० रुपयांपेक्षा अधिक दर देऊन आपली प्रतिष्ठा राखते का? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह गेटकेनधारकांचे लक्ष लागले आहे.