Anger over being told not to put lame chickens in cars, one killed in Indapur
इंदापूर : कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मवर 'लंगड्या कोंबड्या गाडीत भरू नका,' असे सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यात घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, इंदापूर पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
रियाज चुन्नुमिया जागीरदार (रा. हडपसर, पुणे) असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
निखिल जाधव, विकी ननावरे (दोघे रा. गलांडवाडी नंबर,१ ता.इंदापूर) लहू शिंदे, विशाल कांबळे ( रा.,शिरसोडी ,ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे असून इंदापूर पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून निखिल जाधव हा फरार आहे.
फिर्यादी आसिफ युन्नस शेख (रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथील विशाल सूर्यवंशी यांच्या पोल्ट्री फार्म जवळ ही घटना घडली आहे. त्यांचे मेव्हणे रियाज जाहागिरदार हे पोल्ट्री फार्मवर कोंबड्या भरत असताना, लंगड्या कोंबड्या गाडीत टाकू नका असे सांगितल्यावर वाद निर्माण झाला. या वादातून निखील जाधव, विकी नलावडे, लहु शिंदे आणि विशाल कांबळे या चौघांनी मिळून रियाज यांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने बारामती आणि नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी निखील जाधव सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.