

इंदापूर: इंदापूर शहरातील साईसेवा क्लिनिकमध्ये डॉ. प्रदीप दडस यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघा जणांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील डॉक्टर संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत पोलिसांना निवेदन देत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर शहरातील भार्गवराम बगीचालगत असलेल्या जुन्या अकलूज मार्गावर डॉ. प्रदीप दडस यांचे साईसेवा क्लिनिक आहे. शनिवारी (दि. 19) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाना कोळेकर (रा. तरंगवाडी, ता. इंदापूर), दयानंद रामचंद्र जाधव आणि रवींद्र भंडलकर (दोघे रा. कौठळी, ता. इंदापूर) हे रुग्णालयात आले.
त्यांनी कंपाउंडर आणि डॉ. दडस यांचे भाऊ यांना मारहाण केली, तसेच डॉ. दडस यांच्या उजव्या हातावर लोखंडी स्टुलने वार करत त्यांना गंभीर दुखापत करीत लाथा-बुक्क्यांनीही देखील मारहाण करण्यात आली. यावरून इंदापूर पोलिस ठाण्यात वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान इंदापूर शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध करत इंदापूर पोलिस ठाणे येथे निवेदन दिले असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.