इंदापूर : इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षित प्रभागांची बुधवारी सोडत काढण्यात आली. त्यातील आरक्षणामुळे अनेक नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले असून, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः महिलांसाठी राखीव प्रभागांमुळे अनेक महिला कार्यकर्त्या आता निवडणुकीच्या मैदानात उतरायला सज्ज झाल्या आहेत.
नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये खुल्या गटासाठी सोडत निघाल्यानंतर उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महिला आरक्षण सोडत कार्यक्रमात आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये महिलांच्या आरक्षणानुसार एकूण वीस जागांपैकी दहा जागांवर महिला, तर उर्वरित दहा जागांमध्ये सात जागी सर्वसाधारण, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक अनुसूचित जाती सोडत जाहीर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एक आणि दोनमधील अब्दुल्ला सत्तार मोमीन, आरोही अच्युत राऊत आणि सय्यल विलास पाटोळे या विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्या काढल्या.
या नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीकरिता माजी नगरसेवक, स्थानिक नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सोडतीच्या निकालानंतर सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले, तर काही ठिकाणी शांतता आणि गणितमांडणी सुरू झाल्याचे चित्र होते.
यापूर्वी नगरपरिषदेच्या 17 नगरसेवकांच्या संख्येत तीनने वाढ होऊन 20 झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढलेली दिसून आली. सर्वांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे लागल्या होत्या. या निवडणुकीत इंदापूर नगरपरिषदेत एकूण 10 प्रभाग असून, प्रत्येक प्रभागातून 2 नगरसेवक निवडले जाणार आहेत. एकूण 20 नगरसेवकपदांसाठी मतदान होणार आहे.
प्रभाग क्रमांक : 1 अ) अनुसूचित जाती, ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 6 अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7 अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 9 अ) अनुसूचित जाती, महिला ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 10 अ) अनुसूचित जाती, महिला ब) सर्वसाधारण; महिलांसाठी राखीव 10 जागांपैकी 5 जागा सर्वसाधारण, 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि 2 अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. उर्वरित दहा जागांमध्ये सर्वसाधारण 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग 2 आणि अनुसूचित जाती 1 असा समावेश आहे.
सोडतीचा निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी काँग््रेास, दोन्हीही शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग््रेास तसेच अपक्ष इच्छुक यांनी आपल्या उमेदवारांच्या यादीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत