

खेड : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 10 प्रभागांतील 21 नगरसेवकपदांच्या जागांची आरक्षण सोडत बुधवारी (दि. 8) प्रांत अधिकारी अनिल दौडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी जाहीर केली. यामध्ये 11 जागा महिलांसाठी, तर 10 जागा पुरुषांसाठी आरक्षित झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आरक्षण सोडत होऊन नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाले आहे. प्रत्यक्षात सोडतीकडे नागरिकांनी, विशेषत: महिलांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. 11 महिला नगरसेवक जागा असतानाही केवळ 7 महिला उपस्थित होत्या. यामुळे निवडून येणाऱ्या महिला नगरसेवकांचा कारभार त्यांचे पती हाकतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. (Latest Pune News)
आजच्या सोडतीनुसार, प्रभाग 1 आणि 2 मध्ये प्रत्येकी एक जागा नामाप्र आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग 3, 4 आणि 5 मध्ये प्रत्येकी एक सर्वसाधारण महिला आणि एक सर्वसाधारण, प्रभाग 6 मध्ये नामाप्र महिला आणि सर्वसाधारण, प्रभाग 7 मध्ये अनुसूचित जमाती महिला, नामाप्र आणि सर्वसाधारण महिला, प्रभाग 8 आणि 9 मध्ये प्रत्येकी नामाप्र महिला आणि सर्वसाधारण, तर प्रभाग 10 मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला अशा जागा आरक्षित झाल्या आहेत.
आरक्षण सोडतीसाठी माजी नगराध्यक्ष बापू थिगळे, माजी सरपंच प्रदीप कासवा, माजी नगरसेविका रेखा क्षोत्रिय, संपदा सांडभोर, समीर आहेर, मनोहर सांडभोर, मंगेश गुंडाळ, सागर सातकर, राहुल पिंगळे यांच्यासह मर्यादित इच्छुक, समर्थक आणि नागरिक उपस्थित होते. आरक्षण सोडतीचे नियोजन नगरपरिषदेचे अधीक्षक राहुल लामखडे, साधना शिंदे, विद्या वऱ्हाडी, अमर मारणे, धनश्री राऊत, गणेश देव्हरकर आणि माधुरी पाटील यांनी केले.
तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहरात पाणी, कचरा, रस्ते आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा ही प्रमुख आव्हाने आहेत. निवडणुकीनंतर निवडून येणाऱ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांना ही समस्यांची सोडवणूक करावी लागणार आहे. राजकीयदृष्ट्या या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले असून, सत्तेची गणिते जुळवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत मतदारांना आकर्षित करण्याची स्पर्धा तीव होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेत येईल आणि कोणत्या उमेदवाराला मतदार पसंती देतील? हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, शहरातील प्रलंबित प्रश्न आणि राजकीय रणधुमाळीमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरणार आहे.