Dattatray Bharne Pudhari
पुणे

Indapur Market Committee Petrol Pump: निमगाव केतकी उपबाजारात पेट्रोल पंप उभारणार

शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी योजना; निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना राबवते. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम करते. निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील उपबाजार समितीच्या आवारात इंधनाची सोय व्हावी म्हणून पेट्रोल पंपाची उभारणी करणे महत्त्वाचे आहे. बाजार समितीला निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

रविवारी (दि.8) निमगाव केतकी येथील उपबाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात भरणे बोलत होते. ते म्हणाले, सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना देखील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपये कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने केंद्र व राज्यातील सरकार ठामपणे उभे आहे. पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 39 हजार कोटी रुपये दिले जातात. तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी जमीन, भीमा नदीवर पूल बांधणी यांसह इतरही विकासकामे सुरू आहेत.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे व बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, की बाजार समितीचे काम पारदर्शी व सर्वांना बरोबर घेऊन केले जाते. बाजार समितीवर एक रुपयाचे देखील कर्ज नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रास्ताविकात बाजार समितीचे सभापती तुषार जाधव म्हणाले, की इंदापुरातील पेट्रोल पंपाच्या माध्यमातून बाजार समितीस चोपन्न लाखांचा नफा झाला आहे.

या पंपाचा फायदा शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना होणार आहे. या वेळी प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, भरत शहा, हनुमंत कोकाटे, देवराज जाधव, वसंत मोहोळकर, बापूराव शेंडे, रणजित भोंग, प्रवीण डोंगरे, तात्यासाहेब वडापुरे, अतुल मिसाळ यांच्या सर्व संचालक शेतकरी विकास सोसायटीचे सभासद उपस्थित होते. संतोष गदादे यांनी सूत्रसंचालन केले. बाजार समितीचे सचिव संतोष देवकर यांनी आभार मानले.

निमगाव केतकीला दोन महिन्यांत मोठे गिफ्ट

निमगाव केतकी ह्या गावाची उत्तराई, ऋण आयुष्यात विसरू शकत नाही. जैन बांधवांसाठी सभागृह, गावात रस्ते यांसह विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. पुढील दोन महिन्यांत निमगावसाठी मोठे गिफ्ट देणार असल्याचा शब्द कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT