इंदापूर/भिगवण: “अर्रर्र मी लय मोठा आहे, खानदानी आहे, पैशाने मोठा आहे. साडेसतरा एकर ऊस, साडेसतरा एकर केळी आणि उजनीच्या कडेला 75 एकर जमीन आहे. कळलं! नोकरीची गरज नाही, हौस म्हणून नोकरी करतो. आपल्या बापाला पावणेदोन लाख रुपये पेन्शन आहे, कुठे पैसे लागले ना की कणाकणा 10-20 लाख टाकून मोकळा होईल. आपण सगळ्यांना पुरून उरतो.”
हे काय कोणी राजकीय व्यक्ती, भांडवलदार, व्यावसायिक किंवा ठेकेदाराचे शब्द नाहीत, तर इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांची विधाने आहेत. त्यांचा या बेताल व वादग््रास्त वक्तव्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांची स्वतःची आर्थिक व सामाजिक ताकतीची एक प्रकारे झलकच माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष रकटे यांना बोलताना दाखवून दिली आहे. याबाबत माहिती अशी की, माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष रकटे हे शेटफळगढे येथील गट नंबर 252 मोर. नं. 589772029 मूळ प्रकरणाची नक्कल मिळवण्यासाठी रीतसर गेले होते. त्यावेळी कुलकर्णी यांनी वरिष्ठांकडे तक्रार करता, याचा राग मनात धरून रकटे यांनी वरील विधाने केली. यानंतर रकटे यांनी 112 नंबर डायल करून पोलिसांना पाचारण केले. मात्र, तोपर्यंत कुलकर्णी यांनी कार्यालयातून धूम ठोकली होती.
रकटे हे भूमी अभिलेख कार्यालयात जाताच कुलकर्णी यांनी आपला रुबाब गाजवत राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. ‘साहेबाला पाठवलं आणि कुठे पाठवलं? मी घाबरण्यातला नाही. मी पळतच आहे. प्रॉपर मला नोकरीचीसुद्धा गरज नाही,’ असे म्हणत त्यांनी आपल्याकडे असलेली संपत्तीचा लेखाजोखा मांडला. ‘नकलेचा अर्ज केला असला तरी नकला उपलब्ध नाहीत. उपलब्ध झाल्यावर देऊ’, असे म्हणत उडवाउडवी केली.
दरम्यान, रकटे यांनी नकलांची मागणी केली. त्यावर कुलकर्णी यांनी ‘साहेबांकडे जायचेच कशाला, मी आहे ना इथे, ऑफिस बिफिस गेलं तिकडं... तुम्हाला जे काय करायचे ते करा. माझ्या मागे बाया लावल्या, गडी लावले पण मी पुरून उरलो. शासनाचे काम करतो, म्हणजे मी पगारासाठी काम करतोय असं नाही. हौस म्हणून काम करतो, असे म्हणत रकटे यांच्यावर राग व्यक्त करताना व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. ‘आपण देखील पळसदेवचा आहे आणि आपले पाहुणे देखील शेटफळ येथे आहेत का कळलं का?’ अशीही मग््रुारीची भाषाही त्यांनी वापरली.
याप्रकरणी अधिकारी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तर इंदापूर भूमि अभिलेखचे उपअधीक्षक सुशील पवार म्हणाले, संबंधित मुख्यालय सहाय्यक कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वीच वरिष्ठांकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. ते मद्यप्राशन करून येतात, म्हणून त्यांना तशी कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आलेली आहे. आता याप्रकरणी प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे इंदापूरसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.