राजेंद्र कवडे देशमुख
बावडा: इंदापूर तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाखालील क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून प्रतिवर्षी सातत्याने घट होत आहे. परिणामी, इंदापूर तालुक्याची मरब्बी ज्वारीचा तालुकाफ अशी असलेली ओळख काळाच्या पडद्याआड गेल्याचे चित्र आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्याची मउसाचे आगरफ अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे.
इंदापूर तालुका हा गेल्या अनेक दशकांपासून ज्वारीचे आगर म्हणून प्रसिद्ध होता. त्याकाळी घरोघरी शेतकऱ्यांकडे ज्वारीच्या कडब्याच्या गंजी व खिलार गायी तसेच शेतीकामांसाठी बैलांचे दावण पाहावयास मिळत असे. बदलत्या काळानुसार निरा व भीमा नद्यांवर जागोजागी झालेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून शेतकऱ्यांच्या निर्माण झालेल्या जलसिंचन योजना, यामुळे तालुक्यातील हंगामी शेतीचे रूपांतर बारमाही शेती, असे होऊ लागले. परिणामी, ज्वारीसारखे हंगामी पीक मागे पडू लागले व तालुक्याची मरब्बी ज्वारीचा तालुकाफ ही ओळख हळूहळू पुसली जाऊ लागली.
इंदापूर तालुक्यातील साखर कारखानदारीमुळे शेतकरी आर्थिक उत्पन्न देणाऱ्या ऊस व इतर नगदी पिकांकडे वळला आहे. अनेक शेतकरी फळबागेकडे वळल्याची माहिती प्रगतशील शेतकरी शब्बीर मुलाणी (भरणेवाडी), रमजान शेख (बावडा), विठ्ठल फडतरे (कचरवाडी-बावडा), रावसाहेब घोगरे (सुरवड) यांनी दिली.
पूर्वी इंदापूर तालुक्यात निरा व भीमा नदीकाठच्या गावांमध्ये व परिसरात रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेण्यात येत होते. त्या वेळी कडबा खरेदीसाठी अनेक जिल्ह्यांतून शेतकरी तालुक्यात येत असत. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इंदापूर तालुका हा राज्यामध्ये पंढरपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा बागायत तालुका म्हणून ओळखला जात आहे.
इंदापूर तालुक्यात सिंचनाच्या सुविधा वाढल्याने उसाचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाऊ लागल्याने आपोआपच ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. ज्वारीसाठी शेतमजूरवर्गाची मोठी कमतरता भासत आहे. या पिकापासून मिळणारे आर्थिक उत्पन्नही कमी झाल्याने बदलत्या काळाच्या ओघात ज्वारी पिकाखालील क्षेत्र अतिशय कमी झाले आहे. परिणामी, तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मंगळवेढा, बार्शी, सांगोला, मोहोळ या परिसरांतून कडबा विकत घ्यावा लागत आहे, असे सरपंच रणजित गिरमे (बावडा), रणजित वाघमोडे (गोंदी-ओझरे), शिरीष वाघमोडे व दीपक गुळवे (काटी) यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यात चालू रब्बी हंगामामध्ये अगदी तुरळक ठिकाणी ज्वारीचे पीक पाहावयास मिळत आहे.
ज्वारीची खळी गायब!
पूर्वी रब्बी हंगामामध्ये ज्वारी उत्पादक शेतकरी व शेतमजुरांची मोठी धांदल पाहावयास मिळत असे. ज्वारी पिकाची काढणी अनेक ठिकाणी सामुदायिक पद्धतीने भलरीच्या निनादात केली जात असे, तर शेतात कणसाची मळणी करण्यासाठी जागोजागी ज्वारीचे खळे पाहावयास मिळत असे, ते वातावरणच भारावलेले असे. मात्र, आता ज्वारीची खळी काळाच्या ओघात गायब झाल्याची खंत जुन्या पिढीतील शेतकरी रामचंद्र पाटील (चाकाटी) यांनी व्यक्त केली.