Tobacco Pudhari
पुणे

Indapur Gutkha Seizure Case: इंदापूरमध्ये 35 लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

बंद गॅरेजमधून अवैध साठा उघड; खरा मालक कोण यावर संशय, तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: इंदापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करीत 35 लाख 51 हजार 416 रुपये किमतीचा विक्रीस बंदी असलेला गुटखा पकडला आहे. गलांडवाडी नंबर 1 गावच्या हद्दीत एका बंद टाटा गॅरेजमधून कारवाई करत पोलिसांनी हा गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिस हवालदार अभिजित दत्तात्रय एकशिंगे यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार इंदापूर शहरातील व्यंकटेशनगर येथील शकील इमायतुला काझी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलिस निरीक्षक नाळे यांच्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी 1 गावच्या हद्दीत आरोपीच्या मालकीच्या बंद गॅरेजच्या गोडाऊनमध्ये सुगंधी सुपारी गुटखा ठेवल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इंदापूर पोलिसांनी मिळून एकत्रित कारवाई केली. या ठिकाणी गोडाऊन मधून तब्बल 35 लाख 51 हजार 416 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे करीत आहेत.

चोर सोडून संन्यासाला फाशी?

छापा टाकला ते बंद गॅरेज भाडे तत्त्वावर अन्य व्यक्तीस दिले होते. त्यामुळे या ठिकाणी काही अवैध गुटखा सदृशसाठा सापडला असला तरी त्याचा मूळ मालक कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे भाडेकरू किंवा त्याचे साथीदार अवैध धंदे करत होते का, या बाजूनेही तपास होणे गरजेचे आहे. या कारवाईत पोलिसांकडून गॅरेज मालकालाच आरोपी केले आहे. त्यामुळे मुख्य आरोपींना अभय दिले जात आहे का? असा संशय व्यक्त करत चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT