इंदापूर : उत्तर प्रदेश राज्यातून वीटभट्टी कामासाठी आलेल्या कामगारांचा मुकादम वीटभट्टी मालकांचे कामाचे आगाऊ पैसे घेऊन निघून गेला. त्यामुळे मालकाने 20 मजुरांना व त्यांच्या बारा लहान मुलांना अशा एकूण 32 जणांना नजरकैदेत ठेवले. त्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने इंदापूर तहसील व पोलिस प्रशासनाने सुटका केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Latest Pune News)
वेदप्रकाश (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही), सचिन अशोक शिंदे (रा. इंदापूर), कुमार गोकूळ दिवसे (रा. नरुटवाडी, ता. इंदापूर) आणि राहुल नारायण शेटे (रा. भांडगाव, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत शाहरुख गुलाब शाह हसन (वय 25, रा. जोगीपूर, ता. चंदौशी, जि. हसनपूर, उत्तर प्रदेश) याने इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याने उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकारी व कामगार आयुक्त तसेच जनसाहस या संस्थेला बंदी करून नजर कैदेत ठेवल्याचे पत्रव्यवहार करीत कळविले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
वीटभट्टी मालकाने मुकादमाला दिलेले पैसे मिळत नाही तोपर्यंत सर्व कामगारांनी या ठिकाणी काम करावे लागेल तसेच येथून तुम्ही जाऊ शकत नाही, असे म्हणत त्यांची अडवणूक केली. त्यांना जाण्यास विरोध करीत नजरकैदेत ठेवले तसेच त्यांच्याकडून काम करवून घेतले. इंदापूर तहसील कार्यालय आणि पोलिस प्रशासनाने इंदापूर नरुटवाडी आणि भांडगाव या ठिकाणांहून मंगळवारी (दि. 14) ते शनिवारी (दि. 18) या दिवसांत 32 पैकी 10 पुरुष, 10 महिला आणि 12 लहान मुलांना प्रशासकीय भवनातील तहसील कार्यालयाच्या आवारात राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली होती. शनिवारी सायंकाळी या सर्वांना खासगी वाहनाने उत्तर प्रदेशकडे रवाना करण्यात आले. पुढील तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.