इंदापूर: इंदापूर शहरातील अंबिकानगर परिसरात २९ वर्षीय डॉक्टरांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. डॉ. अवधूत विठ्ठल खबाले (वय २९ रा. अंबिकानगर, इंदापूर) असे मयत डॉक्टराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. मेडिकल व्यावसायिक प्रताप छगन खबाले यांना त्यांचे बंधू डॉ. शिवाजी खबाले यांनी याबाबत फोनवरून माहिती दिली. त्यानंतर नातेवाईक आणि इंदापूर पोलिसांच्या मदतीने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
मयत डॉक्टरांच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते, त्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. डॉक्टर अवधूत खबाले हे त्वचारोग तज्ञ म्हणून इंदापुरात नावारूपाला येऊ लागले होते.
वैद्यकीय क्षेत्रातील तरुण डॉक्टरने अचानक जगाचा निरोप घेणे हे धक्कादायक असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव हे करीत आहेत.