मिलिंद कांबळे
पिंपरी(पुणे) : पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि पिंपरी ते वनाज या मार्गावर मेट्रोने प्रवास करण्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज सरासरी 65 हजार नागरिक मेट्रोतून प्रवास करत आहेत. पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) स्टेशनवरून ये-जा करण्यास सर्वांधिक नागरिकांनी पसंती दिली आहे. फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक या विस्तारीत मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला झाले. ऑगस्टच्या एका महिन्यात तब्बल 20 लाख 40 हजार 484 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यातून महामेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. मेट्रोतून दररोज 65 हजार नागरिक प्रवास करीत असून, दिवसाला सरासरी 9 लाख 78 हजार रुपयांचे उत्पन्न महामेट्रोला मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे शहर मेट्रोने जोडले गेल्याने नोकरदार, विद्यार्थी व इतर मंडळी मेट्रोने ये-जा करण्यास पंसती देत आहेत. सरकारी व शासकीय कार्यालय, आरटीओ व शैक्षणिक कामासाठी तसेच, खरेदीसाठी कामासाठी पुण्यात जाणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ती मंडळी मेट्रोला पसंती देत असल्याचे चित्र आहे.
सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मेट्रो धावते. साप्ताहिक सुटीच्या दिवशी शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने नागरिक मेट्रोतून प्रवास करीत आहेत. प्रत्येक रविवारी प्रवासी संख्या 1 लाखाच्या पुढे जात आहे. मेट्रोचा आनंद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील नागरिक सहकुटुंब साप्ताहिक सुटीच्या दिवशी अधिक संख्येने गर्दी करीत आहेत. त्यामुळे मेट्रोस अक्षरश: लोकलमधील गर्दीचे स्वरूप प्राप्त होत आहे. पंधरा ऑगस्टच्या दिवशी मेट्रोला विक्रमी गर्दी झाली होती.
एकूण तिकीट विक्रीपैकी 53.41 टक्के नागरिकांनी डिजीटल पेमेंटद्वारे तिकीट घेतले आहे. तर, 46.59 टक्के नागरिकांनीं रोखीने तिकीट घेतले. सुमारे 27 टक्के नागरिकांनी रिटर्न प्रवासाचे तिकीट काढले. मेट्रोचे एक पुणे कार्ड पहिल्या 15 हजार नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत 11 हजार कार्डची विक्री झाली आहे. कार्डची किंमत 177 रुपये आहे. प्रवाशांसाठी शनिवार व रविवार प्रवासी भाड्यामध्ये 30 टक्के सवलत आहे. कार्डचा वापर करणार्यांसाठी दररोज 10 टक्के सवलत आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी भाड्यामध्ये 30 टक्के सवलत आहे.
पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (पीसीएमसी) ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर सर्वात जास्त 2 लाख 3 प्रवाशांनी पीसीएमसी स्टेशनवरून प्रवास केला आहे. तर, या मार्गावरील सर्वात कमी 10 हजार 432 प्रवासी संख्या कासारवाडी स्टेशन
येथे नोंदविली गेली आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे शहर मेट्रोने जोडले गेले आहे. मेट्रोमुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम व सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. घर किंवा कामांच्या ठिकाणापासून पिंपरी व दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमपीएलची फिडर सेवा सुरू केली आहे. काही ठिकाणी सुरू करत आहोत, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
हेही वाचा