खोर: शहरापुरताच मर्यादित असलेला सोशल मीडियाचा जलवा आता थेट खेडोपाड्यांत झिरपला आहे. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात मोबाईल फोनची सहज उपलब्धता आणि स्वस्त इंटरनेटमुळे तरुणाई सध्या इन्स्टाग्रामवर अक्षरशः झपाटली आहे. गावातील तरुण मुले-मुली ‘रील्स’च्या दुनियेत एवढी रमली आहेत की ती आता त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे.
दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील जवळपास 65 टक्के तरुणाई इन्स्टाग्रामवर अत्याधिक वेळ घालवत आहे. काही वर्षांपूर्वी टिक-टॉकने तरुण पिढीला झपाटले होते. मात्र, त्यावर बंदी आल्यापासून इन्स्टाग्रामने केवळ त्याची जागाच घेतली नाही, तर तरुणांच्या रोजच्या सवयींवरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. (Latest Pune News)
गावच्या अस्सल रील्स पडतायत शहराच्या पसंतीस...
गावातील शेतकरी कुटुंबातील मुले, तरुण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईलवर मनोरंजक रील्स तयार करीत आहेत. नृत्य, अभिनय, गाणी किंवा हास्यरस अशा विविध व्हिडीओंनी ग्रामीण तरुणाई शहरी नेटकर्यांच्या पसंतीस चांगलीच उतरली आहे. परिणामी, फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढते आहे.
खोर (ता. दौंड) येथील प्रतीक गाडे हा तरुण केवळ मजेसाठी रील्स बनवत होता. पण, काही महिन्यांतच त्याचे 27 हजार हून अधिक फॉलोअर्स झाले. प्रतीक सांगतो की, गावातल्या मित्रांसोबत मजेत केलेल्या व्हिडीओंना इतका प्रतिसाद मिळेल असे कधी वाटलेच नव्हते.
आता तर जाहिरातींच्या माध्यमातून इन्स्टाग्रामकडून उत्पन्नही मिळायला लागले आहे. आमच्यासारख्या ग्रामीण तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी हे मोठे व्यासपीठ ठरत आहे.
पैशाचे आकर्षण नवी मोहिनी
लोकप्रियता मिळाल्यामुळे फॉलोअर्स वाढतात आणि त्यातून इन्स्टाग्रामकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. हीच मोहिनी अनेक तरुण-तरुणींना आकर्षित करते आहे. मोबाईलवर रील्स बनवून केवळ लोकप्रियता नाही, तर उत्पन्न मिळू शकते, ही संकल्पना आता ग्रामीण तरुणाईला भुरळ घालते आहे.
इन्स्टाग्राममुळे ग्रामीण भागातील तरुणाईला स्वतःच्या कला-कौशल्याला व्यासपीठ मिळाले आहे. अनेक तरुण शेतकरी कुटुंबातील असूनसुद्धा आपल्या कलेच्या जोरावर नाव कमावत आहेत. मात्र, या व्यासपीठाचा अतिरेकी वापर होणे ही चिंतेची बाब आहे. सोशल मीडियावर घालवला जाणारा वेळ अभ्यास, रोजगार किंवा वैयक्तिक विकासाकडे वळवणे आवश्यक आहे; अन्यथा या मोहजालामुळे भविष्यात तरुणाईच्या मानसिक व शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
पालक व ग्रामस्थांमध्येही इन्स्टाग्रामच्या वाढत्या क्रेझबद्दल चिंता व्यक्त होत आहे. मोबाईलमध्ये दिवस-रात्र गुंतलेल्या तरुणांमुळे घरकामे, शेतमजुरी तसेच अभ्यास मागे पडत असल्याची हळहळ गावोगावी ऐकायला मिळत असताना दिसत आहे. इन्स्टाग्राममुळे ग्रामीण तरुणाईला नवे व्यासपीठ, संधी आणि प्रसिद्धी मिळत आहे. पण, याचबरोबर जबाबदार्या व अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये, हे तितकेच महत्त्वाचे आहे.