Increase in theft incidents in Junnar taluka
नारायणगाव: जुन्नर तालुक्यात पुन्हा चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिन्यात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यात पोलिसांना अपयश आले.
नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास तीन-चार दुकाने चोरट्यांनी फोडून रोख रक्कम व काही साहित्य लंपास केले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. येडगाव, पिंपळवंडी, बोरी व पिंपरी पेंढार येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा अद्याप शोध लागलेला नाही. (Latest Pune News)
वडगाव आनंद येथील प्रशांत चौगुले यांच्या घरी काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीतील मुद्देमाल व काही चोरटे सापडले. मात्र, टोळी शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. इतर चोरीचा तपास लागलेला नाही. वारुळवाडी येथे काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या पोलिस कर्मचार्यांच्या घरी चोरी झाली होती. त्याचाही शोध लागलेला नाही.
दरम्यान, जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधरी यांची बदली होऊन त्यांच्या जागी धनंजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांच्यासमोर चोरांना रोखण्याचे आव्हान आहे. जुन्नर तालुक्यात आता बिबट्याबरोबरच चोरट्यांचीही भीती निर्माण झाली आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा पथकाला सतर्क करणे गरजेचे आहे.