लोणावळा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहर आणि परिसरात मागील 10 दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे लोणावळा तसेच शहराच्या जवळपास असणारी धरणे-तलावदेखील भरत आली आहेत. रेल्वेच्या मालकीचे भुशी धरण यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे. तर, टाटा पॉवरच्या लोणावळा धरणात 88 टक्के आणि वलवण धरणात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे.
या शिवाय नगर परिषदेचे तुंगार्ली धरणदेखील पूर्ण भरले असून, ओव्हरफ्लोचे पाणी धरणाच्या मागील कॅनॉलने वलवण धरणाकडे वाहू लागले आहे. टाटा पॉवरच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा धरण परिसरात गुरुवारी (दि. 27) सकाळी 7 वाजेपर्यंतच्या 24 तासांत 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणातील जलसाठा 10.22 द. ल. घ. मी. इतका झाला आहे. धरणात जवळपास 1 हजार क्यूसेकने पाण्याची अवाक होत असून, धरणाच्या कॅनॉलद्वारे वीजनिर्मिती केंद्राकडे 650 क्यूसेकने पाणी सोडले जात आहे. शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचलेले दिसत आहे.
हवामान विभागाकडून पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास लोणावळा धरण पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच, इंद्रायणी नदीपात्रालगत व सखल भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्या, असे टाटा पॉवरचे धरणप्रमुख बसवराज मुन्नोळ यांनी नगरपरिषद प्रशासनाला कळविले आहे.
हेही वाचा