पुणे

Pune News : सततच्या पावसाचा कांद्याला फटका ; सडू लागल्याने बाजारपेठेत पाठविण्याची लगबग

अमृता चौगुले

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या 10 दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसाचा फटका बराकीत साठविलेल्या कांद्याला बसला आहे. कांदे सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कांदे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याची लगबग शेतकर्‍यांनी सुरू केली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या 10-12 दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडला. चांगला बाजारभाव मिळण्ण्च्या आशेने या परिसरात बहुतांश शेतकर्‍यांच्या बराकीत अजूनही कांदे मोठ्या प्रमाणावर साठवलेले आहेत. परंतु, या साठवलेल्या कांद्याला आता पावसाचा फटका बसला आहे. चहूबाजूंनी जोरदार पाऊस पडत असल्याने अनेक कांदा बराकींमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेकांच्या कांद्यांना आता कोंबदेखील फुटले आहेत. सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्यांना बाजारपेठेत 10 किलोला 150 ते 120 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव समाधानकारक नाही. परंतु, नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कांदे विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवू लागले आहेत.

चारापिकेही सडली

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात चाराटंचाईची समस्या कायम आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे चारापिके सडू लागली आहेत. अनेक ठिकाणी चारापिकांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे जनावरांना खायला चारा मिळेनासा झाला आहे. याचा फटका दूध उत्पादक शेतकर्‍यांना बसला आहे. पारगाव, काठापूर, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करतात.

यंदा उन्हाळ्यापासूनच चाराटंचाईचा सामना शेतकरी करीत आहेत. यंदाचा उन्हाळा अतिशय कठीण गेला. त्यानंतर तब्बल तीन महिने पावसाने दडी मारली. परिणामी, चाराटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले. मात्र, गणेशोत्सवापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. या परिसरात दररोज जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे मका, कडवळ, घास या चारापिकांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे. अनेक ठिकाणी चारापिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे ही चारापिके आता काळी पडू लागली आहेत. अशा चार्‍याला दूध देणारी जनावरे तोंडही लावत नाहीत. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT