पुणे

पुणे : वारजे-कोंढवेधावडेत समीकरण जुळले तर राष्ट्रवादीला आव्हान

अमृता चौगुले

प्रदीप बलाडे

वारजे : इथला जुना प्रभाग क्रमांक 32 (वारजे माळवाडी). त्याला वारजे रस्त्याच्या पलीकडील भाग व समाविष्ट गावांतील कोंढवे-धावडे-कोपरे हा परिसर जोडून नवीन प्रभाग क्रमांक 34 (वारजे कोंढवे धावडे) तयार झाला आहे. वारजे माळवाडीतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या प्रभागात असंख्य सोसायट्या आहेत. तेथे भाजपला मानणारा मतदार असला, तरी आजतागायत या भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकच निवडून आले आहेत.

आतापर्यंत राष्ट्रवादीचेच वर्चस्व

जुन्या प्रभागातील चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हा प्रभाग वारजे ज्ञानेश सोसायटी ते कोंढवे-धावडे कोपरे गावापर्यंत गेलेला आहे. हा भाग पालिकेत समाविष्ट झाल्यापासून आजपर्यंत 2007 मध्ये एक जागा काँग्रेसला, तर 2012 मध्ये एक जागा मनसेला मिळाली होती. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली असली, तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचाच या प्रभागात विजय झाला होता.

वारजे-कोंढवे-धावडे या प्रभागात सध्या विकासकामांत चढाओढी, टीका, श्रेयवादाचे राजकारण सुरू असून, गोकुळनगर पठार, माळवाडी व शेजारील भागातील मते निर्णायक ठरणार आहेत. ते मतदार कोणाच्या बाजूने कौल देतील हे सांगणे कठीण आहे. प्रभागातील सध्याचे राजकीय समीकरण जुळले तर राष्ट्रवादी काँग्रेससमोर तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त

प्रभागात प्रमुख पक्षांकडून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षाने तिकीट नाकारल्यास काही इच्छुक उमेदवारी मिळेल त्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जुन्या प्रभागातील दोन विद्यमान नगरसेवक या प्रभागात येत असून, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, सचिन दोडके, प्रदीप धुमाळ यांच्यासह समाविष्ट कोंढवे-धावडे गावातील विद्यमान सरपंच नितीन धावडे, शुक्राचार्य वांजळे, गणेश धावडे, रूपाली धावडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. भाजपकडून भारतभूषण बराटे, किरण बारटक्के, सचिन दशरथ दांगट, वासुदेव भोसले, रोहिणी भोसले, मनीषा दांगट, श्रद्धा काळे, जगन्नाथ चौधरी इच्छुक आहेत. काँग्रेसकडून अमिर चौधरी, तसेच शिवसेनेकडून बाळासाहेब मोकाशी, अजय पोळ, मयूर वांजळे, संतोष शेलार, आरपीआयकडून नीलेश आगळे, अरविंद शिंदे, सुभाष सहजराव, किशोर पंडागळे, दीपाली धिवार, मनसेकडून नाना सोनवणे, प्रिया बराटे, केशर सोनवणे या इच्छुकांची नावे सध्या चर्चेत आहेत.

अशी आहे प्रभागरचना

वारजे, कोंढवे-धावडे, अतुलनगर, एनडीए, खडकवासला, उरितनगर, आदित्य गार्डन सिटी, पॉप्युलरनगर, सहयोगनगर, विठ्ठलनगर, उत्तमनगर, न्यू कोपरे, करण ग्रीन सोसायटी, रेणुकानगर, शोभापुरम, माई मंगेशकर रुग्णालय, वारजेचा भाग, ज्ञानेश सोसायटी, सिद्धिविनायक कॉलनी, गिरीधरनगर, राहुल निसर्ग सोसायटी, भैरवनाथनगर, नक्षत्र सोसायटी, शिवणे, लक्ष्मीस्पर्श सोसायटी, स्वरूपदर्शन सोसायटी, मारुती रेसिडेन्सी, सिंहगड सृष्टी फार्म.

  • लोकसंख्या – 64,919
  • अनुसूचित जाती – 5,962

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT