पुणे

पुणे : प्रभाग 3 मध्ये लोहगावकरांचेच वर्चस्व राहणार

अमृता चौगुले

उदय पोवार

लोहगाव : लोहगावचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर स्थानिक उमेदवार असणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच इच्छुकांनी लोहगावचा पहिला नगरसेवक होण्यासाठी कंबर कसली आहे. लोहगाव-विमाननगर असा प्रभाग असला, तरी लोहगावचे मतदान जास्त असल्याने या वेळी लोहगावला किमान दोन नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे.

लोहगावची जुनी हद्द तसेच नवी हद्द एकत्रित करून त्याला विमाननगरची जोड दिल्याने नवा प्रभाग क्रमांक 3 निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये दोन सर्वसाधारण व एक अनुसूचित जाती, असे आरक्षण असणार आहे. यामध्ये महिला किंवा पुरुष उमेदवार असू शकतात. विमाननगरच्या काही भागाचा समावेश आहे. या अगोदर देखील हा प्रभाग 3 नंबरचाच होता. चार नगरसेवकांपैकी केवळ नगरसेवक राहुल भंडारे हे एससीमधून या प्रभागातून लढण्यास इच्छुक आहेत. बाकीचे तीन नगरसेवक वेगवगेळ्या प्रभागांतून आपले नशीब आजमावणार आहेत.

लोहगाव भागातील सुमारे 40 हजार मतदार आहेत. त्यामुळे या प्रभागात लोहगावकरांचेच वर्चस्व राहणार आहे. त्यामुळेच अनेक इच्छुकांनी यासाठी काही महिन्यांपासून मोर्चेबांधणीला सुरुवात देखील केली आहे. उमेदवारांची यादी मोठी असली तरी मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच होणार असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी स्वतंत्र लढल्यास सर्व इच्छुक इतर पक्षांत अ‍ॅडजस्ट होऊ शकतात.

लोहगावचे राजकारण आजी माजी आमदारांवर

ग्रामपंचायत काळापासून चालत आलेले प्रतापदादा खांदवे, पांडुरंग खेसे गटासह आजी-माजी आमदारांवर लोहगावचे राजकारण अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशोकबापू खांदवे, नवनाथ मोझे, बंडू खांदवे, राजेंद्र खांदवे, मिलींद खांदवे हे प्रमुख इच्छुक असून सर्वसाधारण पुरुष अथवा महिला यापैकी एक उमेदवारी आपल्या पारड्यात पाडून घेण्यास उत्सुक आहेत. यासोबतच अनुसूचित जाती या जागेसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष ओव्हाळ, संतोष राखपसरे, विकास झेंडे, तुषार खरात, विजय भोसले, बिपीन घोरपडे, भुजंग लव्हे, अभिजित रोखडे, राहुल शिरसाठ इच्छुक आहेत.

राजकीय गणीते शिवसेनेवर अवलंबून

भारतीय जनता पक्षाकडून सुनील खांदवे मास्तर, संतोषलाला खांदवे, मोहनराव शिंदे हे प्रमुख इच्छुक असून, हे आपल्या घरातील महिलेस उमेदवार मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. अनुसूचित जाती या जागेसाठी विद्यमान नगरसेवक राहुल भंडारे, रावसाहेब राखपसरे हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून सोमनाथ ऊर्फ बाळासाहेब खांदवे, अमित जंगम तर मनसेकडून कृष्णा मोहिते असे इच्छुक आहेत. प्रतापदादा खांदवे यांचे चिरंजीव प्रीतम खांदवे हे राष्ट्रवादी व भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेना स्वतंत्र लढल्यास शिवसेनेचा देखील पर्याय त्यांच्यापुढे असू शकतो. त्यांच्यावरच बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.

चार माजी उपसरपंच इच्छुक

लोहगावमधून चार माजी उपसरपंच नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहत आहे. तर एक माजी पंचायत समिती सभापती व उपसभापती हेदेखील इच्छुक आहेत. या सर्वांचे गावपातळीवरील सर्वेसर्वा यांच्यामुळेच ही पदे आतापर्यंत मिळाली आहेत, आतापर्यंत पद भोगलेले हे इच्छुक आता पक्षातून जरी उमेदवारी मागत असले, तरी या वेळी देखील या सर्वांना गटप्रमुखांचीच गरज लागणार आहे.

अशी आहे प्रभागरचना

संपूर्ण लोहगाव, खांदवेनगर पार्ट, कलवड, खेसे पार्क पार्ट, वायुसेना नगर, एअरफोर्स कॅम्पस, विमाननगर, फिनिक्स मॉल, ईडन गार्डन सोसायटी, साकोरेनगर पार्ट, कवडेवस्ती, तुळजाभवानी नगर.

प्रभागाची लोकसंख्या
  • एकूण लोकसंख्या 61,836
  • अनुसूचित जाती 8592
  • अनुसूचित जमाती 727

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT