पुणे : पुढारी वृत्तसेवा : खिशातील मोबाईलचा वापर करून चहावाला, भाजीवाला व रिक्षावाला यांना झटकन पेमेंट करणारा महावितरणचा वीजग्राहक मात्र विजेचे बिल भरण्यासाठी रांगेत कसा उभा राहतो, हे आजच्या डिजिटल युगातील कोडेच नव्हे काय? रांगेत उभे राहून आपला वेळ व पैसा वाया घालवणे हे खरोखरच आश्चर्यकारक नाही का? आजच्या डिजिटल युगात महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील 39 टक्के लघुदाब वीजग्राहक आपला वेळ व पैसा वाया घालवत रांगेत उभे राहून वीजबिल भरत आहेत.
तत्पर भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो ग्रीन या तिन्हींचा वापर केला तर यावर महावितरण दरमहा 3.78 टक्के सवलत देत असल्याची माहिती महावितरण पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली आहे. वीज ग्राहकांनी मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते. हे बिल भीम अॅप, गुगल पे, पेटीएम किंवा बँकेच्या अॅपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत मिळते.
याखेरीज ग्राहकांनी छापील अथवा डिजिटल बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही बिल भरता येते. कागदी बिलाच्याऐवजी ईमेलने बिल स्वीकारण्याचा गो ग्रीनचा पर्यावरणपूरक पर्याय निवडला तर प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळते. पुणे प्रादेशिक विभागात या महिन्यात वीज बिलाचे 12 हजार 836 चेक बाऊन्स झाले आहेत.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार महावितरण पुणे प्रादेशिक विभागात जून महिन्यात एकूण 47 लाख 86 हजार 692 ग्राहकांनी 1 हजार 392 कोटी रुपयांच्या वीज बिलाचा भरणा केला. यात 29 लाख 40 हजार ग्राहकांनी 913 कोटी रुपयाचे ऑनलाइन भरणा केलेला आहे. जून महिन्यात पुणे परिमंडळात 26 टक्के ग्राहकांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर न करता व रांगेत उभे राहून वीज बिल भरले, तर कोल्हापूर परिमंडळात यांचे प्रमाण जवळपास 56 टक्के, तर बारामतीत याचे प्रमाण हे 48 टक्क्यांवर आहे.
हेही वाचा :