पुणे: कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालक बिल्डर-पुत्रासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सर्व दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पुणे सत्र न्यायालयात शुक्रवारी सरकार पक्षातर्फे प्रत्येक आरोपीविरोधातील आरोप आणि पुराव्यांची माहिती सादर करण्यात आली. त्यावर बचाव पक्षातर्फे दोन जुलै रोजी बाजू मांडली जाणार असून, त्यानंतर आरोपींविरोधात आरोप निश्चिती होणार आहे. (Latest Pune News)
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 226 नुसार विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी तब्बल साडेचार तास युक्तिवाद करत खटल्याची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर मांडली. कल्याणीनगर येथे 18 मेच्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने ‘पोर्शे’कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. त्यावेळी कारचा वेग किती होता, दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती त्यांनी दिली.
सर्व आरोपींचा कटातील सहभाग उलगडत त्यांच्याविरोधातील साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड व व्हॉट्स अॅप संभाषण, डीएनए चाचणी अहवाल, आरोपींची ओळख परेड, हस्ताक्षर तज्ज्ञांचे अहवाल, रक्ताच्या नमुन्यात फेरफार कसा झाला, त्याच्या नोंदी कशा बदलल्या गेल्या, आरोपींनी एकमेकांना पैसे कसे दिले, त्यापैकी तीन लाख रुपये जप्त कसे करण्यात आले, असे तांत्रिक व दृश्य स्वरूपातील पुरावे विशेष सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयात मांडले. दरम्यान, आरोपी अश्पाक मकानदार याने दोषमुक्तीसाठी; तर आशिष मित्तल याने कागदपत्रांच्या मागणीसाठी न्यायालयात अर्ज केला.