पुणे

पुरंदर तालुक्यात यंदा ज्वारीच्या उत्पन्नात घट : पावसाअभावी झाला परिणाम

Laxman Dhenge

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यामध्ये यावर्षी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेर्‍यात वाढ झाली होती. मात्र, पेरणी अहवालावरून ज्वारी, गहू, हरभरा पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामात ज्वारीची पुरंदर तालुक्यात 90 टक्के पेरणी झाली असली, तरी पावसाअभावी कडबा व धान्याच्या उत्पन्नात मोठी घट होत आहे. पुरंदर तालुक्यामध्ये गहू पेरणीचे प्रमाण कमी होऊन जिरायती व बागायती क्षेत्रांवर ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली गेली; परंतु रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अत्यंत कमी पाऊस पडल्याने ज्वारी उगवलीच नाही तसेच उगवलेली ज्वारी कणसापर्यंत आलीच नाही.

त्यामुळे पेरणी अधिक झाली असली, तरी ज्वारीपासून मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी मिळत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामातील जवळपास अपेक्षित सरासरी पेरणी क्षेत्रांपैकी जवळपास 90.83 टक्के क्षेत्रावर ज्वारी पिकाची दगडी व मालदांडी तसेच इतर वाणाची पेरणी झाली होती. परंतु पावसाने उघडीप दिल्याने बहुतांश भागात ज्वारी पीक जळून गेले. तालुक्यातील वाल्हे, दौंडज, पिसर्वे, राजेवाडी, वाघापूर, गराडे, वीर, परिंचे, बेलसर, नीरा, जेजुरी परिसरामध्ये सध्या ज्वारी काढणी व मळणीही सुरू झाली आहे. अत्यंत कमी उंचीचा कडबा व कमी दाणे असलेली कणसे यामुळे शेतकर्‍यांसमोर ज्वारीच्या उत्पन्नाबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

असे असते उत्पन्नाचे गणित

कोरडवाहू रब्बी ज्वारीचे उत्पन्न हेक्टरी 650 ते 750 किलो असते व दाण्याच्या दोन ते अडीच पट कडब्याचे उत्पन्न मिळते. बागायती ज्वारीचे हेक्टरी उत्पन्न 1200 ते 1800 किलो असते. तसेच भारी जमिनीत हेक्टरी 4 हजार किलोपर्यंतही असते. ओल्या वैरणीचे उत्पन्न हलक्या जमिनीत हेक्टरी 20 टन आणि भारी जमिनीत 30 ते 35 टन मिळते; परंतु यंदा उत्पन्नाच्या बाबतीत मोठी घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

ज्वारी पेरणी अहवाल (हेक्टरमध्ये)

  • 2023-24  : सरासरी क्षेत्र 17483.1 हेक्टर, पेरणी क्षेत्र 15881.8 हेक्टर,90.83 टक्के.
  • 2022-23  : सरारारी क्षेत्र 22354 हेक्टर, पेरणी क्षेत्र 14382.9 हेक्टर,64.34 टक्के.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT