पुणे: पुणे विभागात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. विभागातील टँकरचा आकडा तब्बल दीडशेच्या वर गेला आहे. पुणे विभागात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. नागरिक पाण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे आठवड्यातून 150 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांसोबतच विभागातील अनेक धरणे, तलावातील जलसाठा कमी झाला आहे. नदी- नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत.
ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरच्या फेर्या सुरू झाल्या आहेत, तर अनेक ग्रामपंचायतींवर ‘हंडा मोर्चा’ निघत आहेत. उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज स्थानिक स्वराज्य संस्थांनी न केल्याने नागरिकांचा असंतोष दिसून येत आहे.
मागील तीन दिवसांपासून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर परिसरातील तापमानात वाढ झाल्याने पाणीटंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागातील गावांत यंदाही भीषण पाणीटंचाई आहे.
गावातील तलाव पूर्ण कोरडे पडल्याने गावाशेजारील विहिरीतून महिलांना पाणी आणावे लागत आहे. टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडले जाते आणि मग ते पाणी महिला भरतात. महिलांचा अर्धा दिवस पाणी भरण्यातच जात असल्याचे समोर आले आहे. माण परिसरात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
उन्हाचा पारा अधिकच वाढत चालल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी, झपाट्याने पाणीपातळी खाली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका यांनीसुद्धा तळ गाठल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. दरम्यान, पुढील एक ते दीड महिन्यात अजून पाणीटंचाई वाढण्याची शक्यता असल्याने टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.