पुणे

पिंपरीत ‘पाणीपुरवठा’कडून केवळ 44 टक्के बिलांची वसुली

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. पालिकेवरील थकबाकीचा ताण वाढत असून सद्यस्थितीत पाणीपट्टी थकबाकीचा आकडा सुमारे 68 कोटींच्या घरात पोहोचला आहे.

चालू वर्षात फक्त 53 कोटी रुपयांची वसुली झाली असून एकूण थकबाकीच्या तुलनेत वसुलीचे हे प्रमाण निव्वळ 44 टक्के आहे.
शहरातील लोकसंख्या सुमारे 27 लाखांच्यापुढे गेली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधीं रुपयांचा खर्च केला जातो.

एकीकडे ही परिस्थिती असताना पाणीपुरवठा विभागाकडून उत्पन्न वाढीसाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. हे पाणीपुरवठा विभागाकडील वाढलेल्या थकबाकीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

केवळ अनधिकृत नळजोडांचा बागुलबुवा अधिकारी करतात; परंतु प्रत्यक्षात अधिकृत नळजोडधारकांडून पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे वास्तव आहे.

शहरात 1 लाख 67 हजारांहून अधिकृत नळजोडधारक आहेत. आकडेवारीनुसार सन 2021-22 या वर्षात आजअखेर पाणीपट्टीपोटी 53 कोटी 39 लाख 74 हजार 746 इतकी रक्कम जमा झाली आहे; मात्र या तुलनेत पाणीपुरवठा विभागाकडील थकबाकीचा आकडा वाढत आहे.

68 कोटी 5 लाख 95 हजार 877 इतकी थकबाकी आहे. चालू थकबाकी 57 कोटी 34 लाख असताना 40 कोटी 41 लाख 84 हजार वसुली झाली आहे. तर मागील थकबाकी 64 कोटी 11 लाख असताना केवळ 12 कोटी 97 लाख रुपये वसूल झाले आहेत.

मोठ्या थकबाकीदारांचे नळजोड तोडणार

शहरात पाच वर्षांपासून पाण्याची बिले न भरणार्‍या तसेच, मोठ्या थकबाकीदारांची यादी करण्यात आली आहे. किमान 50 हजार आणि एक लाखांवरील थकबाकीदारांना नोटीसा देण्यात येणार आहेत. मुदतीत थकबाकीसह संपूर्ण बिल न भरल्यास नळजोड तोडण्यात येणार आहेत, असे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

नळजोडास विद्युतपंप लावणार्‍यांवर कारवाई

शहरातील काही नागरिक थेट नळाला विद्युत मोटार पंप लावून पाणी खेचतात. त्यामुळे परिसरातील इतरांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

या संदर्भात तक्रारी वाढल्याने पाणीपुरवठा विभागाने शोध मोहिम हाती घेतली आहे. त्यात काळेवाडीतील नढेनगर परिसरात नळाला थेट विद्युत मोटार पंप लावल्याचे आढळून आले. त्या संबंधितांवर कारवाई करीत पालिकेने 20 मोटारी जप्त केल्या.

त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. नळाला थेट विद्युत मोटार लावून पाणी खेचू नये. जमिनीतील टाकीत पाणी जमा करून ते पाणी मोटार पंपांने वरच्या मजल्यावर घ्यावे. अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

https://youtu.be/5JsVWLXDOHU

SCROLL FOR NEXT