पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ’इनोव्हेशन’मध्ये देशात आठवे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'अटल' या नवोपक्रम राष्ट्रीय क्रमवारीत (अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्युशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात आठवे स्थान मिळवले आहे, तर राज्यपातळीवरील विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिल्या स्थानावर आहे.

विद्यापीठात नवोपक्रम केंद्राने केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळवल्याने विद्यापीठाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. देशातील शैक्षणिक संस्था व विद्यापीठांमध्ये 'नवोपक्रम व उद्योजकता विकास' होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आधिपत्याखालील 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन'तर्फे शिक्षण संस्थांची नवोपक्रमातील उद्दिष्टपूर्ती याविषयक राष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली जाते. 2021 या वर्षात देशातील 1 हजार 438 शिक्षण संस्थांनी या क्रमवारीत सहभाग घेतला होता.

यामध्ये आयआयटी, एनआयटी, आयआयएससी आदी संस्थांचाही समावेश आहे. यामध्ये देशातील अभिमत व राज्य विद्यापीठांच्या पहिल्या दहा विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांनी बुधवारी ही क्रमवारी जाहीर केली.

सात एक्सलन्स सेंटर्स

याबाबत माहिती देताना विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, 'स्टार्टअप, नवोपक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी विषयांशी संबंधित अनेक कार्यक्रम वर्षभरात घेतले. इनोव्हेशन पार्क, आयआयटी खरगपूर, आयआयटी मुंबई, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, व्हेंचर सेंटर अशा अनेक संस्थांसोबत विद्यापीठाने एकत्रित उपक्रम राबविले आहेत. विद्यापीठात सात एक्सेलन्स सेंटर आहेत. विद्यापीठात नवोपक्रम व उद्योग, या विषयातील तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ अनेक उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी जोडले गेले आहे. सध्या विद्यापीठात 40 स्टार्टअप सुरू आहेत, तर 340 संलग्न महाविद्यालयांत इनोव्हेशन सेल स्थापन केले आहे.'

''विद्यापीठाने कॅम्पसवर व संलग्न महाविद्यालयात नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती रुजविण्यासाठीच 'इनोव्हेशन सेल'ची स्थापना विद्यापीठात केली आहे. शिक्षण, उद्योग आणि सामाजिक प्रश्न यांच्या एकत्रीकरणातून नवोपक्रम आणि नवसंशोधन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अटल क्रमवारीत मिळालेले हे स्थान विद्यापीठाने केलेल्या कामाची पावती आहे.''

                                                                                     – डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT