नितीन वाबळे
मुंढवा : संपूर्ण भीमनगर व बी. टी. कवडे रस्त्याचा पूर्वेकडील भाग तसेच संपूर्ण वैदुवाडी, रामटेकडी आणि वानवडीचा अर्धा भाग मिळून नवीन प्रभाग क्रमांक 26 तयार झाला आहे. येथे राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या तिन्ही पक्षांची ताकद समतुल्य आहे. राष्ट्रवादीचे आनंद आलकुंटे व अशोक कांबळे हे येथील विद्यमान नगरसेवक आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये मतसंख्येत रामटेकडी येथे शिवसेना एक नंबरला होती. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद येथे जास्त असल्याचे दिसून येते.
आत्ताच्या प्रभाग 21, प्रभाग 24 व प्रभाग 25 चा काही भाग मिळून नवीन प्रभाग 26 तयार झाला आहे. प्रभागातील भीमनगर व बी. टी. कवडे रोड येथे राष्ट्रवादी व भाजप यांची ताकद आहे. येथून कोणता पक्ष कोणाला संधी देतो, याची उत्सुकता राहणार आहे. वैदुवाडीचाही जवळपास पूर्ण भाग या नवीन प्रभागात आला आहे. वैदुवाडी येथे मागील पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.
मनपा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच रामटेकडीचे दोन प्रभागांत विभाजन झाले आहे. त्यापैकी मुख्य रस्त्याच्या खालील भाग नवीन झालेल्या प्रभाग 26 मध्ये, तर रस्त्याच्या वरील टेकडीकडील भाग नवीन झालेल्या सय्यदनगर-लुल्लानगर या प्रभाग क्रमांक 42 मध्ये गेलेला आहे. रामटेकडी येथे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. वानवडीचेही दोन प्रभागांत विभाजन झालेले आहे. वानवडीचा जवळपास अर्धा भाग प्रभाग 26 मध्ये आला आहे. उर्वरित अर्धा भाग नवीन झालेल्या वानवडी-कौसरबाग या प्रभाग 43 मध्ये गेला आहे. येथे राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसची ताकद समतुल्य असल्याचे नागरिक सांगतात. येथील मते मिळविण्यासाठी प्रत्येक पक्षात चुरस निर्माण होईल, असे चित्र आहे.
प्रभाग 26 मध्ये पडणारे आरक्षण, राष्ट्रवादी-शिवसेना व काँग्रेसचा आघाडीबाबत काय निर्णय होतो तसेच येथे भाजप कशी समीकरणे जुळवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष पॅनल करून निवडणूक रिंगणात उतरण्याची भूमिका काही तगडे उमेदवार बोलून दाखवीत आहेत. या प्रभागातील रामटेकडी येथे शिवसेना व काँग्रेस तर वानवडी व भीमनगर येथे राष्ट्रवादीचे चांगले मतदान आहे. तसेच, रामटेकडी हा मागील अनेक वर्षांपासून काँग्रसचा बालेकिल्ला राहिलेला आहे.
मागील पंचवार्षिकमध्ये मतसंख्येत फक्त रामटेकडी येथे शिवसेना एक नंबरला, दोन नंबरला राष्ट्रवादी व काँग्रेस या आघाडीमधील काँग्रेस पक्ष, तीन नंबरला अपक्ष व चार नंबरला भाजपा होते. त्यामुळे या प्रभागातील रामटेकडी येथे महाविकास आघाडीची ताकद जास्त असल्याचे दिसून येते. प्रभाग 26 मध्ये एससीचे आरक्षण आहे. राष्ट्रवादी व भाजपाकडून एससी उमेदवार कोण असेल याबाबत निश्चित नाव अद्याप पुढे आलेले नाही. येथे एससीमधून राष्ट्रवादीकडून दोन बडे नेते इच्छुक आहेत. यापैकी ज्या एकाला उमेदवारी मिळणार नाही ते पक्ष बदलाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.
या प्रभागात राष्ट्रवादीकडून आनंद आलकुंटे, अशोक कांबळे, अण्णा म्हस्के, प्रफुल्ल जांभुळकर हे इच्छुक आहेत. तसेच शिवसेनेकडून सतीश कसबे, मुकुंद लाकडे, रवींद्र जांभुळकर, सुरेश कांबळे हे इच्छुक आहेत. काँग्रेसकडून अभिजित शिवरकर, खंडू लोंढे, सुभाष सरोदे, रेखा भडके हे इच्छुक आहेत. भाजपकडून धनंजय घोगरे, इम्तियाज मोमीन, शक्तीसिंग कल्याणी, अशोक लाकडे हे इच्छुक आहेत.
संपूर्ण भीमनगर, बी. टी. कवडे रस्त्याच्या पूर्वेकडील भाग, संपूर्ण वैदुवाडी, शंकरमठ, रामटेकडीचा अर्धा भाग, एसआरपीएफ 1 व 2, फातिमानगर चौकाच्या पुढील वानवडीचा जांभुळकर चौकापर्यंतचा भाग, प्लेजन पार्क, उदयबाग या भागाचा नवीन झालेल्या प्रभाग 26 मध्ये समावेश झालेला आहे.