आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. यामुळे साधारण ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांचे कांदा पीक पीळ पडून करपली तर काही पिवळे पडून रोगट झाले आहे. दोन महिने होऊनही कांद्याच्या वाढीस पोषक हवामान न मिळाल्यामुळे कांद्याच्या गाठीही तयार झाल्या नसल्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे व कमी बाजारभावामुळे मागील दोन वर्षांपासून शेती करणे अत्यंत अवघड झाले आहे. कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने अवकाळी पाऊस, बदलते वातावरण व धुके अशा प्रतिकूल परिस्थितीत बेल्हे (ता.जुन्नर) येथील शेतकरी मच्छिंद्र शिंदे यांनी दिवाळीनंतर आपल्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मात्र, वातावरणातील सततच्या बदलामुळे कांदा पिकावर प्रतिकूल परिणाम झाला.
अडीच महिने होऊनही कांद्याच्या वाढीस पोषक हवामान न मिळाल्यामुळे कांद्याच्या गाठीही तयार झाल्या नाही. वारंवार औषध फवारण्या करूनही काहीच उपयोग झाला नाही. लागवडीसह खते व औषध फावारीसाठी केलेला एक लाख रुपये खर्च वसूल होणार नसल्याने शिंदे यांनी रविवारी दोन एकर कांद्याच्या उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकरी संकटात सापडला आहे, तरी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
उत्पादन खर्चही वसूल होणार नाही
अडीच महिन्याच्या कांदा पिकातून मशागत, मजुरी, बि-बियाणे, औषधे व खते यांचा झालेला खर्चही वसूल होणार नसल्याने आशेवर पाणी फिरले. अखेर वैतागून किमान मुक्या जिवांना तरी चारा होईल म्हणून दोन एकर कांद्याच्या पिकामध्ये शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्या आहेत. – मच्छिंद्र शिंदे, शेतकरी, बेल्हे