पुणे

बारामती तालुक्यात अत्यल्प पावसामुळे नोव्हेंबरमध्येच डोंगररांगा ओस

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यात चालू वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सह्याद्रीच्या डोंगररांगा नोव्हेंबर महिन्यातच ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे शेळ्या आणि मेंढ्यांच्या चार्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वन विभागांतर्गत येणार्‍या डोंगर-दर्‍यातील वनसंपदातील गवत जळू लागल्याने मेंढपाळांपुढे चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंत गवताने भरलेली वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगररांगा ओस पडू लागल्या आहेत. परिणामी, यावर जगणार्‍या शेळ्या-मेंढ्यांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच, वन्यप्राण्यांची होरपळ होत असल्याने तेही मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.

डोंगर-दर्‍यावरील पाण्याचे नैसर्गिक स्रोत कोरडे पडले असून, वन्यप्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात राज्यमार्गावर येत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे डोंगर-दर्‍यांत ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याच्या टाक्या उभारणे गरजेचे आहे. निसर्गसंपदा जोपासून ती वाढीसाठी सतत प्रयत्न करावे लागणार आहेत. अलीकडील काळात काही समाजकंटक वन विभागातील गवताला वणवा लावत आहेत. त्यामुळे गवत जळून जाण्याबरोबरच गवतात असणार्‍या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते; मात्र अवकाळी पावसाने हुलकावणी दिल्याने भविष्यात शेतीचा, जनावरांच्या पाण्याचा-चार्‍याचा प्रश्न शेतकर्‍यांना पुढे उभा राहणार आहे.

जिरायती भागासह बागायती भागातील पट्ट्यालाही चालू वर्षी चार्‍याचा आणि पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. अनेक मेंढपाळांनी चार्‍याचा प्रश्न ओळखून तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असेपर्यंत जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न काही प्रमाणात मागे लागला असला तरी भविष्यात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न शेतकर्‍यांना सतावणार आहे. चालू वर्षी बारामती तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने उसासह तरकारी पिकांचे उत्पन्न घटले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT