पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील आचार्य आनंदऋषीजी चौकातील कोंडी सोडविण्यासाठी हा चौक सिग्नलमुक्त करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून बाणेर आणि औंधकडे जाणार्यांना पाषाण रस्त्याने अभिमानश्री सोसायटीमार्गे बाणेर रस्त्याने जावे लागणार आहे. विद्यापीठ व औंधकडे जाणार्यांना बाणेर रस्त्याने राजभवनच्या मागील बाजूने औंध रस्त्याकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेट्रोच्या कामामुळे पाषाण आणि बाणेर रस्त्यावर वाहतूक कोंडीला नागरिकांना सामना करावा लागत आहे.
इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे बराच वेळ अडकून राहावे लागते. सायंकाळी विद्यापीठ चौकापासून कृषी महाविद्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. तर, सकाळच्या वेळेत औंध-बाणेरच्या दिशेने रांगा लागतात. गेले काही महिने पुणेकरांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच हा कोंडीचा मुद्दा उच्च न्यायालयातदेखील गेला होता. वाहतूक शाखेने नव्याने काही बदल केले आहेत. त्यानुसार औंध, बाणेरकडून येणारी वाहने आणि शिवाजीनगरकडून येणारी सिग्नलला न थांबता इच्छितस्थळी जाऊ शकतात. त्यादृष्टीने वाहतूक पोलिसांकडून पावले उचलली गेली आहेत.
हेही वाचा