Akshar Wari Pudhari
पुणे

Akshar Wari: सर्वधर्मसमभाव‌ : लोकशाहीचा आत्मा

लौकिक अर्थाने शिक्षित नसलेले, विविध खेड्यापाड्यात राहणारे गरीब, दीनदुबळे लोक आजही सहिष्णू आणि उदार आहेत, असेच म्हणावे लागेल.

पुढारी वृत्तसेवा

आपल्या देशात विविध जाती-धर्माचे, विविध भाषा बोलणारे, विविध पेहराव, विविध चालीरिती, विविध खानपान पद्धती असणारे लोक राहतात. ‌‘सर्वधर्मसमभाव‌’ हा आपल्या लोकशाहीचा आत्मा असून, एवढी विविधता असूनदेखील भारत देश हा एकसंध आहे.

लौकिक अर्थाने शिक्षित नसलेले, विविध खेड्यापाड्यात राहणारे गरीब, दीनदुबळे लोक आजही सहिष्णू आणि उदार आहेत, असेच म्हणावे लागेल. येथील जनता सहनशील, समंजस व सुसंस्कृत आहे. याचे कारणच भारतभूमी ही ऋषिमुनी, तपस्वी आणि संत सज्जनांची आहे.

हे संत लोककवी-लोकनायक होते. ते योगी-उद्योगी आणि उदार-विचारी होते. त्यांनी समाजाला नीती आणि सदाचाराची शिकवण दिली. सामान्य माणूस त्यांच्या मागे चालत राहिला. संतांनी समाजामधील भेदभावांची धार बोथट केली आणि म्हणूनच आपला हा गावगाडा सुसंस्कृत आणि समंजस राहू शकला.

‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’ जयघोष मंत्रच

या संतमंडळीत विविध जाती-धर्माचे स्त्री-पुरुष होते. विशेषतः महाराष्ट्रातील जनसामान्यांवर संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज या दोन संतांचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसून येतो. 'ज्ञानोबा-माऊली-तुकाराम' हा महाराष्ट्रातील जनतेचा जणू जयघोष मंत्रच झाला आहे. या मंत्राला जाती-धर्माची बंधने नाहीत किंवा उच्च-नीचतेचा संसर्ग नाही.

महाराष्ट्रातील जनतेचा अंतरीचा आध्यात्मिक आवाज म्हणजेच 'ज्ञानोबा-माऊली-तुकाराम' आणि हाच जयघोष करत तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आळंदी-देहूवरून हजारो वारकऱ्यांसह प्रस्थान केले आहे व या पालख्या, हे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

- डॉ. एस. एन. पठाण, (लेखक माजी कुलगुरू व आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक-सल्लागार आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT