

कोल्हापूर : खासदार पार्थ पवार यांच्या विवाहासंदर्भात व्यक्त होत असलेल्या धार्मिक शंकांचे निरसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पूज्य शंकराचार्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. याच वेळी त्यांनी विवाहाची तारीख आणि ठिकाण जाहीर केले.
कुटुंबातील आई किंवा वडिलांचे निधन झाल्यास, एका वर्षाच्या आतच विवाह उरकावा लागतो; अन्यथा पुढील तीन वर्षे लग्नकार्य करता येत नाही, असा एक समज समाजात आहे. या पार्श्वभूमीवर करवीर पीठाच्या शंकराचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. करवीर पीठाचा छत्रपती शाहू महाराजांशी ऐतिहासिक संदर्भ असल्याने, या रूढी आणि परंपरेमागची खरी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी हे मार्गदर्शन घेण्यात आले.
याबाबत माहिती देताना उमेश पाटील म्हणाले, "शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे की, आई-वडिलांच्या निधनानंतर धर्मशास्त्रानुसार आवश्यक ते सर्व विधी व संस्कार योग्य प्रकारे पार पाडणे गरजेचे असते. मात्र, एका वर्षाच्या आतच विवाह केला पाहिजे, असे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे याबाबतीत कोणताही गैरसमज बाळगण्याचे कारण नाही."
दरम्यान, खासदार पार्थ पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी २९ जुलै २०२६ रोजी अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईक व निमंत्रितांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडणार आहे.
पार्थ पवार यांच्या होणाऱ्या वधूचे नाव कायनात दारा असे असून, त्या मूळच्या चंदीगड येथील असून सध्या दिल्लीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही माध्यमांतून त्यांच्या जन्मठिकाणाबाबत व नावाबद्दल चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत होती. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, यासाठी ही अधिकृत माहिती देण्यात येत आहे.