पुणे; पुढारी वृत्तसेवा : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ऑनलाईन भाडेकरार (लिव्ह अॅण्ड लायसन्स) आणि सदनिकांचे प्रथम विक्री करारनामे (फर्स्ट सेल) यांच्यासाठीदेखील दस्त हाताळणी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून (दि.7 ) करण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारपासून भाडेकराराच्या दस्ताला 300 रुपये आणि सदनिकेच्या प्रथम विक्री करारनाम्याच्या दस्तासाठी एक हजार रुपये दस्तहाताळणी शुल्क आकारले जाणार आहे.
या दोन्ही प्रकारच्या ऑनलाईन दस्तांना दस्त हाताळणी शुल्क आकारण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी परिपत्रक जारी केले आहे. नोंदणी विभागाकडून वर्षाला सुमारे 40 हजार कोटींचा महसूल जमा होतो. या विभागाने नागरिकांना अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये ऑनलाईन भाडेकरार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून सदनिका खरेदी करणार्या नागरिकांसाठी विकासकाच्या कार्यालयातच दस्तनोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या दोन्ही प्रकारच्या सुविधांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ऑनलाईन सुविधांसाठी संगणकप्रणाली देखभाल, अद्ययावतीकरण, सर्व्हर, साठवणूक, हार्डवेअर, कनेक्टिव्हिटी यांवरील खर्च, माहितीचा प्रचार, प्रसार यांसाठी खर्च होत आहे. त्यामुळे ऑनलाईन दस्तांसाठीदेखील दस्त हाताळणी शुल्क आकारणे आवश्यक आहे, यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
नोंदणी विभागाकडून लिव्ह अॅण्ड लायन्सला प्रत देतात का, दस्त नोंदणीनंतर 30 मिनिटांत दस्त मिळतो का, सीडी देणार होते ते बंद केले आहे, छायाचित्राची पाने रंगीत प्रत देणार होते, देतात का, ऑनलाईन भाडेकरार लगेच मिळतो का, दस्ताची ई-मेलवर येणारी प्रत मिळते का, दिलेल्या वेळेत दस्त नोंदणी होते का, संगणकप्रणाली वारंवार बंद पडते त्याची जबाबदारी कोण घेणार, त्याबाबत संबंधित सहजिल्हा निबंधक जबाबदारी घेणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा