पुरंदरला परप्रांतीय झाले उदंड; खबरदारी घेणे गरजेचे Pudhari
पुणे

Purandar News: पुरंदरला परप्रांतीय झाले उदंड; खबरदारी घेणे गरजेचे

भाडेकरार न करताच शहर, गावखेडे ते वाड्या-वस्त्यांपर्यंत वास्तव्य

पुढारी वृत्तसेवा

परिंचे: पुरंदर तालुक्यात सासवड, जेजुरी, निरा यासह माळशिरस, वाघापूर चौफुला, चांबळी, भिवरी, दिवे, गराडे ते अगदी पांगारे, परिंचे, वीरपर्यंत परप्रांतीयांची घुसखोरी वाढली आहे. हे सर्वजण कोणतेही भाडेकरार न करता बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. त्यातूनच गुन्हेगारी वाढू लागली आहे. यावर आळा बसणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

पुरंदर तालुक्यातील गावखेड्यांपासून वाड्या-वस्त्यांपर्यंत परप्रांतीय राजरोसपणे व्यवसाय, रोजगाराच्या निमित्ताने कुठलीही ओळख न दाखवता, भाडेकरार न करता घरमालकांना जास्त भाड्याचे आमिष देत राहत आहेत.

अनेक घरमालकही डिपॉजिट आणि भाडे जास्त मिळाल्यामुळे या परप्रांतीयांची जास्त चौकशी न करता आपले फ्लॅट, खोल्या तसेच गाळे भाड्याने देत आहेत. यामध्ये सुतारकाम करणारे, गवंडीकाम करणारे, फॅब्रिकेशनची कामे करणारे, तसेच पडेल ते आणि मिळेल ते काम करणारा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात ग्रुपने खोल्यांमध्ये राहत आहे. (latest pune news)

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक ते अगदी नेपाळमधीलही अनेकजण गावोगावी व गल्लोगल्ली दिसत आहेत. यातील काही कामगार इमाने-इतबारे चांगले कामही करत आहेत. परंतु, काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी दारू पिऊन आपापसांत भांडणे करून गावातील वातावरण दूषित करत आहेत. यातील अनेक त्यांच्या राज्यात गुन्हेगारी करून इकडे पळून आल्याचेही समजते.

मात्र, भविष्यात या लोकांमुळे पुरंदर तालुक्यातही एखादा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. सासवडमध्ये सोमवारच्या बाजारामध्ये अनेकदा गर्दीचा फायदा घेत मोबाईल, महिलांचे दागिने, पुरुषांचे पाकीट चोरी जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.

पोलिसांत तक्रार करूनही आपली वस्तू आपल्याला मिळेलच याची खात्री नसल्यामुळे नागरिक तक्रार करत नाहीत. मध्यंतरी पुरंदर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असणारे निरा या ठिकाणी एकाच वेळेस पाच दुचाकी बाजारातून चोरीला गेल्या आहेत.

तसेच, जेजुरीतूनही छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना वेळोवेळी घडताना दिसत आहेत. गावखेड्यातील विहिरींवरील वीजपंप, गायी, म्हशी, बैल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. तसेच, काही ठिकाणी अनेक परप्रांतीय मजुरांनी आपल्या राहत्या घराच्या शेजारील अल्पवयीन मुलींनाही फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे वेळीच पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच, प्रत्येक गावातील पोलिस पाटील व सरपंच यांनीही आपल्या गावात असलेल्या परप्रांतीयांची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करून त्यांची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे; अन्यथा चुकीच्या घटना घडल्यास त्याला सरपंच व पोलिस पाटील यांना जबाबदार धरले पाहिजे, असेही नागरिक बोलत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT