Doctors Pudhari
पुणे

Pune IMA Medical Strike: डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर वैद्यकीय सेवा बंद; पुण्यात १० हजार डॉक्टरांचा सहभाग

आयएमएचे २४ तास आंदोलन; आपत्कालीन सेवा सुरू राहणार, रुग्णालयांतील सुरक्षेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचार्‍यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) २० जुलै रोजी सकाळी ६ ते २१ जुलै रोजी सकाळी ६ या २४ तासांच्या कालावधीत राज्यभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. या आंदोलनात पुण्यातील आयएमएसह विविध डॉक्टर संघटनांचे जवळपास १० हजार डॉक्टर सहभागी होणार आहेत.

पावसाळ्यातील बदलत्या वातारवरणामुळे सध्या शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, उपचारासाठी ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत शहरातील दहा हजारांहून अधिक डॉक्टर २४ तासांसाठी वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्यसेवा विस्कळीत होऊन रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बंद कालावधीत आपत्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आयएमएतर्फे राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पुण्यातील आयएमएसह इतर डॉक्टर संघटनांचे डॉक्टर सहभागी होणार आहेत, अशी माहिती आयएमए पुणेच्या अध्यक्षा डॉ. अलका क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. सुनील इंगळे, डॉ. अनिकेत जोशी, डॉ. अंजली साबणे यांनी दिली.

डोंबिवली घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र मेडिकेअर कायदा अधिक कडक व प्रभावी करावा, सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये २४ तास सुरक्षा व्यवस्था बंधनकारक करावी, डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांवरील हिंसाचाराविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण लागू करावे, डॉक्टरांना सुरक्षित, निर्भय वातावरणात काम करण्याची हमी द्यावी.

डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांच्या निषेधार्थ आयएमएतर्फे राज्यभरात आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात पुण्यातील १० हजार डॉक्टर सहभागी होतील.
डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, पुणे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT