पुणे

कात्रज टेकडीलगत बेकायदा मिनी इंडस्ट्री

अमृता चौगुले

पुणे : कात्रज टेकडीची लचकेतोड करीत सुरुवातीला प्लॉटिंग करून आता त्याच्यावर मिनी इंडस्ट्री ठिकठिकाणी उभ्या राहत आहेत. शासनाच्या सर्व परवानग्यांना फाटा देत माननीयांनीदेखील या ठिकाणी कळस केल्याचे 'पुढारी'च्या पाहणीत समोर आले आहे. कात्रजच्या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी नुसते प्लॉटिंगच नाही, तर वेगवेगळ्या मिनी इंडस्ट्रीज उभ्या करण्याचा धडाका लावला आहे. खेड-शिवापूरला इंडस्ट्री झोन आहे. मात्र, त्या ठिकाणापासून कात्रजच्या टेकडीपर्यंत खासगी लोकांची मालमत्ता आहे. या ठिकाणी शेतीझोन असल्याने इंडस्ट्रील गोडावून कसे उभे राहतात हा प्रश्न 'पुढारी'च्या पाहणीमध्ये समोर आला आहे.

टेकडीवरील जागा स्वस्तात मिळत असल्याने या ठिकाणी छोटी-मोठी गोडावून उभारण्यात येत आहेत. टेकडीचाच सहारा घेत अनेक उद्योजकांनी बेकायदेशीर व्यवसाय थाटले आहेत. सहा ते सात लाख रुपये गुंठ्यांनी जागा विकत घेत प्रशासनाच्या अधिकार्‍यांना चकवा देत गुजरवाडी, ससेवाडी, अंजनीनगर, गगनगिरी हिल्स, जांभूळवाडी, दरीपूल या परिसरात मिनी इंडस्ट्रीज जोर धरत आहे.

प्रामुख्याने महापालिकेच्या हद्दीच्याजवळच ही जागा असल्याने तयार करण्यात आलेला माल तातडीने बाजारपेठेत उपलब्ध करून देता येत असल्याने बेकायदेशीर इंडस्ट्रीकडे माननीयांनी आपला मोर्चा वळविला आहे. शेतीझोन असताना इंडस्ट्रीसाठी लागणारे शेड कसे उभे केले जातात. हा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. वनीकरण झालेल्या भागालाच पोखरूण त्या ठिकाणी या इंडस्ट्रीज उभ्या करण्याचा छुप्या पध्दतीने डाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

बेकायदेशीर औद्योगिकीकरणाचे तोटे

  • त्वरित परिणाम म्हणजे नैसर्गिक संसाधने हळूहळू नाहीसे होणे, जमीन, पाणी आणि हवेचे प्रदूषण.
  • वाहनांची रहदारी वाढविणे, कारखान्यांमध्ये मशिनचे सतत काम केल्याने ध्वनी-प्रदूषण आणि धूळ व धूर निर्माण झाला आहे.
  • औद्योगिक साइट्स आणि त्याच्या आसपासच्या सामान्य घाणेरड्या आणि आरोग्यास प्रतिकूल परिस्थितीमुळे मानवी आरोग्यावर आणि
  • आनंदावर परिणाम झाला आहे. पूर्वी न ऐकलेले आजार दूरवर पसरत आहेत.

कमी गुंतवणुकीत 'मालामाल'

कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त मालामाल होण्यासाठी कात्रजच्या टेकडीवर बांधकाम करण्याचा राजमार्ग अनेकांनी स्वीकारला आहे. बेकायदेशीर प्लॉटिंगवर कंपन्या उभ्या करीत अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण मैत्रीमुळे प्रशासनालाच कात्रजचा घाट दाखविण्यात येत आहे. पाच ते दहा लाख रुपये गुंठे दरांनी जमीन खरेदी करून बेकायदेशीर शेड ठोकण्याचा तडका कात्रज टेकडीच्या आजूबाजूने सुरू आहे.

पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांचे कानावर हात?

पुणे महानगर प्राधिकरणाचे अधिकार्‍यांचे कानावर हात आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या इंडस्ट्रीज उभी राहत असल्याचे सर्वसामान्य माणसांना दिसत आहे. मात्र, हे पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांना दिसत नाही ? जर दिसत असेल, तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. कारवाई केलीच असेल, तर पुन्हा पुन्हा अशाप्रकारचे गोडावून, इंडस्ट्री उभी का राहत आहे, असा प्रश्न समोर आला आहे.

कात्रज परिसरात टेकड्यांच्यावर उभ्या राहत असलेल्या बेकायदेशीर कंपन्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी केली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या ठिकाणी ट्रक, टेम्पो यांची वाहतूक वाढते यामुळे अपघात, ट्राफिक जाम होणे अशा प्रकारच्या बाबी घडतात. डोंगर वाचविणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे शिरोळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT