नारायणगाव: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणात सुमारे २० जणांचा बळी गेल्यानंतर जिल्हाभरात हातभट्ट्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू झाले होते. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासनाने अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या.
मात्र, काही आठवडे उलटताच या कारवाया थंडावल्याचे चित्र दिसत असून, जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी गावठी दारूचा व्यवसाय पुन्हा बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
धनगरवाडी, जाधववाडी तसेच मावळ पट्ट्यातील काही भागांमध्ये गावठी दारूच्या भट्ट्या पुन्हा धुराडे सोडत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, या भागांतील हालचालींची माहिती संबंधित यंत्रणांना नसणे अशक्य मानले जात असताना प्रभावी कारवाई मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे कारवाईतील सातत्य आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गावठी दारू व्यवसाय आढळणाऱ्या गावांच्या सरपंचांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. मात्र, या अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी असलेल्या यंत्रणांची जबाबदारी निश्चित होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हातभट्ट्यांवर धडक कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच त्या पुन्हा सुरू कशा होतात? याचे उत्तर नागरिकांना अद्याप मिळालेले नाही.
ग्रामीण भागातील काही हॉटेल आणि ढाब्यांमध्ये खुलेआम दारू व बिअर विक्री होत असल्याचेही सांगितले जात आहे. तक्रारी आल्यानंतर अधूनमधून कारवाया केल्या जात असल्या, तरी त्या केवळ दिखाऊ स्वरूपाच्या असल्याचा आरोप होत आहे. कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा तोच व्यवसाय सुरू होत असल्याने संबंधितांना नेमके कोणाचे संरक्षण मिळते? याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.
अवैध दारूनिर्मिती आणि विक्रीच्या ठिकाणांवर वारंवार कारवाया होत असूनही हा व्यवसाय बंद पडत नसल्याने संबंधित विभागांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून किंवा किरकोळ गुन्हे दाखल करून हा प्रश्न सुटणार नसून, या व्यवसायामागील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाईची गरज असल्याची भावना जनतेत आहे.
दरम्यान, खालपासून वरपर्यंतची यंत्रणा या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची टीका होत आहे. विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असतानाप्रशासन जागे होते आणि काही दिवसांनी पुन्हा सर्व काही पूर्ववत होते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील अवैध दारू व्यवसायाला खरोखरच आळा बसणार की कारवाईचा हा फक्त दिखावा ठरणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला.