

राहू: दौंड तालुक्यातील खामगाव येथील गाडीमोड परिसरातील गुऱ्हाळावर काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय मजुराचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर हा अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारमधून नेऊन वाघोली-राहू रस्त्यावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी जेसीबी चालक, मालक आणि अन्य दोघांविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामू शंभू पासी (वय २३, रा. कोला, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तो एप्रिल २०२६ पासून गाडीमोड येथील गुऱ्हाळावर काम करत होता. त्याचा भाऊ राजू शंभू पासी यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार जेसीबीमालक अविनाश बाळासाहेब यादव, अविनाश यादव, गणेश हरिभाऊ जगताप, कल्लू ऊर्फ प्रधान इस्तकार आणि जेसीबीचालक आलम या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी मध्यरात्री गुऱ्हाळावर जेसीबीचे काम सुरू असताना चालक आलम याच्या निष्काळजीपणामुळे झोपलेल्या रामू पासीच्या अंगावर जेसीबी गेली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती पोलिसांना न देता जेसीबी मालक यादव याने उपस्थितांना हा प्रकार कोणालाही सांगू नका, अन्यथा जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर यादव, जगताप, इस्तकार आणि आलम यांनी संगनमत करून रामूचा मृतदेह कारच्या डिकीत ठेवला.
पहाटेच्या सुमारास तो वाघोली-राहू रस्त्यावर टाकून हा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, ठेकेदार तमेरेज फरीदी यांनी रामू बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर त्याचा भाऊ राजू पासी उत्तर प्रदेशातून दौंड येथे आला. दोन दिवस विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर २१ जून रोजी गुऱ्हाळावर चौकशी केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला.