उरुळी कांचन : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दफ्तरी दारू विक्रीस बंदी असलेल्या उरुळी कांचन शहरात गावठी, देशी - विदेशी तसेच बनावट दारू तयार करून विक्रीचा धंदा चांगलाच बहरात असून, दारू विक्रीची बंदी असणार्या शहरात दारूने महिलांच्या असुरक्षिततेच्या असंख्य तक्रारी असतानाही पोलिसांनी या दारू विक्रीला खुली छुट दिल्याने एक तळीराम थेट ज्ञानदानाचे पवित्र मंदिर असलेल्या शाळेच्या प्रवेशद्वारजवळ जाऊन बेधुंदपणे पडल्याचे भयानक चित्र पोलिसांच्या आशीर्वादाने निर्माण झाले आहे. (Latest News Update)
उरुळी कांचन शहरात गेली दीड वर्ष पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या कार्यकाळातील अवैद्य धंद्याचे बंद असलेले चित्र अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली झाल्यानंतर खुले झाल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. अधीक्षक पंकज देशमुख यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांना पायबंदीच्या राबविलेल्या धोरणामुळे दारू विक्रीस बंदी असलेल्या उरुळी कांचन नगरीत खर्या अर्थाने दारू विक्रीस पायबंद असलेले चित्र होते. आता मात्र त्यांच्या बदलीने शहरातील दारूगुत्ते,अड्डे , गावठी दारू निर्मिती केंद्र, बनावट दारूचे साठे शहरात राजरोसपणे सुरू झाल्याचे चित्र आहे.
उरुळी कांचन शहरात तालुक्याची व्यावसायिक बाजारपेठ असून शिक्षणाची दालने, मंदिरे तसेच मोठ्या प्रमाणात प्रवासी स्थानके असल्याने या ठिकाणी नागरिकांच्या वर्दळीला हे अड्डे व तळीराम मंडळींचा उपद्व्याप नाहक सहन करावा लागत आहे. महत्त्वाच्या चौकात हे दारूचे गुत्ते थाटले असल्याने तळीरामांचा नाहक सामना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाला सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाने गल्लीतील दारू विक्रीचा त्रास महिलांचा सन्मानाला ठेच पोहचण्यापर्यंत पोहचला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात टाकून पोलिस प्रशासनाला सूचना केली होती. परंतु कारवाई सोडाच पण तळीराम थेट शाळेच्या प्रवेक्षद्वारपुढे लोटांगण घालून पडल्याने दारूच्या धंद्यांचा उच्छाद किती वाढला आहे असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान दारू विक्रीच्या व अवैध धंद्यांना खतपाणी घालण्याचा प्रकाराबाबत स्थानिक पोलिसांनी चुप्पी साधली असून पोलिस अधीक्षक संदिपसिंग गिल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.