पुणे: शहरात बंदी घालण्यात आलेल्या ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणाऱ्यांवर पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करीत तिघांना अटक केली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून तब्बल 8 लाख 32 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन दुकानदारांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणात हुसैन अब्दुल रहमान (वय 25, रा. कोरेगाव पार्क, पुणे), हसन शेख (वय 42, रा. एमजी रोड, कॅम्प) आणि अब्दुल इस्माईल जाबीर (वय 28, मोलेदिना रोड, कॅम्प) यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन, आयात-निर्यात, साठवणूक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम 2019 अंतर्गत संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या वेळी 297 ई-सिगारेट, 895 तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अस्मिता लाड, अंमलदार राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.