राजगुरुनगर: खेड तालुक्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये चायनीज सेंटरच्या नावाखाली सर्रास मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारू विक्री केली जात आहे. याचा प्रचंड त्रास गावातील सर्वसामान्य नागरिकांना होत असून, गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे.
खेड तालुक्यात प्रामुख्याने एमआयडीसी क्षेत्र व आदिवासी भागात गावोगावी चायनीज सेंटर सुरू झाले आहेत. गावोगावी चायनीज सेंटर वाढण्याची कारणे मात्र वेगळीच असून, बहुतेक सर्व चायनीज सेंटरच्या नावाखाली अवैध दारू व्यवसाय फोफावत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील प्रत्येक लहान-मोठ्या गावांत सध्या एक-दोन चायनीज सेंटर सुरू आहेत. (Latest Pune News)
या सर्व चायनीज सेंटरवर बेकायदेशीरपणे दारू विक्री केली जाते. ही चायनीज सेंटर ही स्थानिक नेत्यांची किंवा त्यांना राजकीय पाठबळ असलेल्या कार्यकर्त्यांची आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उद्ध्वस्त करणार्या अशा काळ्या धंद्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अनेक मोठ्या गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत ही चायनीज सेंटर सुरू राहत असून, सहज दारू उपलब्ध होत असल्याने तरुणवर्ग व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे. मात्र तक्रार करूनही पोलिस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
आमच्या दावडी गावामध्ये देखील अशी तीन-चार बेकायदेशीर दारू दुकाने सुरू आहेत. गावांच्या चौकात देखील दुकाने आहेत. गावांमध्ये सहज दारू उपलब्ध होत असल्याने मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. यामुळे गावामध्ये भांडणे व वादावादीचे प्रमाण देखील वाढले आहे. सकाळीच अनेक लोक दारू पिऊन चौकात इतरत्र पडलेली दिसतात. यामुळे गावचे वातावरण बिघडत असून, पोलिसांकडे याबाबत ग्रामपंचायतीने तक्रार करून देखील कोणतीही दखल घेतली जात नाही.- संतोष सातपुते, सरपंच, दावडी (ता. खेड)