Purandar Illegal Businesses Pudhari
पुणे

Purandar Illegal Businesses: पुरंदरला अवैध व्यवसायांचा विळखा;जुगार, मटका, दारू-ताडी विक्री, खासगी सावकारकीचा तिढा

पोलिस यंत्रणेसह महसूल विभागाच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे.

पुढारी वृत्तसेवा

परिंचे: पुरंदर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विविध अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत. याचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. यातून पोलिस यंत्रणेसह महसूल विभागाच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे.

तालुक्यातील अनेक हॉटेल, ढाब्यांवर बेकायदेशीर दारू विक्री होते. विविध गावांत जुगार, मटक्याचे क्लब सुरू आहेत. त्यातच ताडीच्या नावाखाली रसायनमिश्रित ताडी विकली जाते. हुक्का पार्लर या प्रकारांनीही तोंड वर काढले आहे. यातून तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

गावोगावांसह शहरांतही अवैध सावकारची पाळेमुळे घट्ट झाली आहेत. या सावकारांनी नागरिकांचे जगणे मुश्किल केले आहे. यांच्या विळख्यात शेतकऱ्यासह अनेक लघुउद्योजक आणि गरजू नागरिक फसले आहेत. याबाबत तक्रार करूनही अनेकदा ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

यासोबतच चोरी, हाणामारी, दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी, कोयत्याच्या वापरातून दहशत निर्माण करणाऱ्या घटनांत वाढ झाली आहे. यामुळे एकंदरीतच तालुक्यातून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत सासवड पोलिस ठाण्यात नवनियुक्त पोलिस निरीक्षकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पोलिस प्रशासनाने नागरिकांशी संवाद वाढवून त्यांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करणे आणि कायद्याचा धाक निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. नवनियुक्त पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल आणि अवैध व्यवसायांना आळा बसेल, अशी अपेक्षा तालुक्यातून व्यक्त केली जात आहे.

सासवड पोलिस ठाण्याच्या कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत. नागरिकांनी कोणालाही न घाबरता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी किंवा माझ्याशी संपर्क साधावा. तसेच अवैध खासगी सावकारांविरोधात नागरिकांनी तक्रार दाखल करावी. त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- संतोष घोळवे, पोलिस निरीक्षक, सासवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT