पुणे: देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण करू शकणाऱ्या कटकारस्थानांवर निर्णायक घाव घालत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) ने 2025 या वर्षात तब्बल 6,510 किलो स्फोटके आणि 767 ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ (आयईडी) जप्त करून निष्प्रभ करण्याची अभूतपूर्व कामगिरी बजावली आहे. या उल्लेखनीय यशामागे पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट (आयआयएम) येथे दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक आणि काटेकोर प्रशिक्षणाचा भक्कम पाया असल्याचे अधोरेखित झाले असून, याचीच दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संस्थेचा गौरव देखील केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने ‘आयआयएम’ येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता. या वेळी या संस्थेची कार्यपद्धती आणि प्रशिक्षण प्रणाली प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. तसेच, नक्षलग््रास्त भागात किंवा दहशतवाद्यांनी पेरलेली स्फोटके कसे निकामी केले जातात, याचे प्रात्यक्षिकही या वेळी पाहायला मिळाले. या वेळी संस्थेचे महासंचालक व प्राचार्य के. के. पांडे यांनी माहिती देताना सांगितले की, 2012 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या 14 वर्षांत आपली क्षमता सातत्याने वाढवली आहे. आजपर्यंत 12,553 हून अधिक अधिकारी आणि जवानांना येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये विविध राज्यांतील पोलिस दल, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, विशेष कृती पथके तसेच मित्र राष्ट्रांतील सुरक्षा दलांचा समावेश आहे.
प्रशिक्षणातील सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जवानांचे आयईडी शोधण्याचे व निष्प्रभ करण्याचे कौशल्य अधिक प्रभावी झाले आहे. परिणामी, घातपाताच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आयआयएमला सीआरपीएफची ’सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था’ म्हणून गौरविण्यात आले. पांडे म्हणाले, “तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असले, तरी प्रत्यक्ष कारवाईदरम्यान मानवी निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. केवळ उपकरणांवर अवलंबून न राहता जवान स्वतःची निरीक्षणशक्ती आणि आधुनिक साधनांची सांगड घालतात, त्यामुळे मोहिमा अधिक यशस्वी होतात.”
भविष्यात ’मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देत संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांच्या सहकार्याने स्वदेशी उपकरणांच्या निर्मितीसाठी संशोधन सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय, प्रशिक्षण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः पावसाळा किंवा प्रतिकूल हवामानात मैदानी प्रशिक्षण देणे कठीण ठरत असल्याने एआयच्या माध्यमातून आभासी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे, ज्यामुळे जवानांच्या सरावात खंड पडणार नाही.
सामान्य नागरिकांमध्येही जागरूकता निर्माण करणार
आयईडीच्या धोक्यांविषयी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी संस्थेकडून लवकरच काही गोपनीय नसलेली माहिती आणि प्रशिक्षण साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे नागरी सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला.