पुणे

हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या : संजय राऊत

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महागाई, बेरोजगारीमुळे नागरिकांमध्ये रोष आहे, त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपचा पराभव होईल, असे विविध सर्वेसह सर्व यंत्रणा सांगत होत्या. दोन्ही राज्यात भाजप जिंकले. आम्ही ईव्हीएमवर दोष देणार नाही, पण हिंमत असेल तर एक निवडणूक मतपत्रिकेवर घ्या, त्यामध्ये जे होईल ते देशाला आणि आम्हाला मान्य असेल, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले.

पुणे शहर शिवसेनेच्या शनिवारी नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. या वेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, संपर्क प्रमुख सचिन अहिर, शशिकांत सुतार, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्षांचे काम जल्लादाचे

'शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस अपात्र आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले आहे. या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यासाठी जल्लादाचे काम विधानसभा अध्यक्षांना करायचे आहे. परंतु, विधानसभा अध्यक्ष या चाळीस आमदारांना अभय देवून भारतीय संविधानाला फासावर लटकवत आहेत,' अशी टीकाही राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली.

औरंगजेबाच्या औलादी महाराष्ट्राचे नुकसान करत आहेत. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यावर चालून येणारा औरंगजेब हा गुजरात मध्ये जन्माला आला. आता गुजरातमधील त्यांच्या औलाद महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये आणि गुजरातमधील ड्रग महाराष्ट्रात येत आहे. यातून मराठी तरुणांची पिढी बरबाद करण्याचे काम गुजरात लॉबी करत आहे. तरुणांना ड्रॅगच्या माध्यमातून कायमचे शांत करण्याचे षड् यंत्र रचले जात आहे. नवे पालकमंत्री कुठे आहेत, गृहमंत्री कुठे आहेत. शिवसेनेला रस्त्यावर उतरून हे अड्डे उद्ध्वस्त करावे लागतील. तुम्ही ईडी सीबीआय लावली तरी आम्ही पुण्याचे रक्षण करू, असाही घणाघात राऊत यांनी केला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT