उत्तर प्रदेशातील सोने चोरीची पाळेमुळे सांगली जिल्ह्यापर्यंत

उत्तर प्रदेशातील सोने चोरीची पाळेमुळे सांगली जिल्ह्यापर्यंत
Published on: 
Updated on: 

विटा; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील कानपूर येथून कोट्यवधी रुपयांचे सोने घेऊन पळून गेल्याच्या प्रकरणाची पाळेमुळे सांगली जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचली असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी संपतराव लवटे महेश मस्के आणि अन्य एक अशा तिघांवर गुन्हे दाखल झाले असून कानपूर पोलिसांचे पथक खानापूर आणि पलूस तालुक्यात कसून चौकशी करीत आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून आणि स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदे शातील कानपूर येथील बेकनगंज सराफी बाजा रात संपतराव लवटे नावाचा गलाई व्यवसायिक आहे. जुने सोन्याचे दागिने वितळवण्यासाठी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून बेकनगंज आणि परिसरातील सर्व व्यावसायिक आपले सोने संपतराव लवटे यांना देत आहेत. तेथे श्री. लवटे यांच्यासह अन्य महेश मस्के आणि अन्य एक व्यक्ती सोने गाळणीचे काम करीत. मात्र गेल्या शुक्रवार, १ डिसेंबरपासून त्यांच्याकडे गाळणी साठी आलेले साडेतीन किलोहून अधिक सोने घेऊन हे तिघे ही पसार झाले आहेत. यानंतर पीडित सराफांनी कानपूर येथील सहपोलीस आयुक्त नीलाबजा चौधरी यांची भेट घेतली.संपतराव लवटेसह फरार झालेले तिघेही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहे. संपतराव लवटे याचे कुटुंब कानपूरातील बिरहान रोड येथील नीलवली गल्लीत भाड्याच्या घरात राहत होते, तर त्यांचे बेकनगंज येथे एसआर गोल्ड टेस्टिंग नावाचे दुकान आहे. गेल्या शुक्रवार पासून ते दोघेही गायब झाले आहेत. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तेही बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर सोमवारी ३ डिसेंबर रोजी काही ज्वेलर्स संपतराव यांच्या नीलवली गल्लीतील घरी पोहोचले असता ते कुलूप होते.ते कुटुंबासह फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कानपूर मधील सराफी बाजारामध्ये एकच खळबळ उडाली असून पीडित सराफी व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिस सहआयुक्त (गुन्हे) यांनी याप्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन करून तपासाचे आदेश दिले आहेत.

३५ हुन अधिक सराफांना फसविले, पण १३ जणच तक्रारीसाठी पुढे

मंगळवारी कानपूर मेट्रोपॉलिटन बुलियन असोसिएशनचे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी पोलिस आयुक्त (गुन्हे) निलब्जा चौधरी यांची भेट घेतली. या प्रकरणात आतापर्यंत १३ सराफी व्यवसायिक पोलिसात गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे आले असून जवळपास ३५ हून अधिक सराफी व्यवसायिकांना संपतराव लवटे,महेश मस्के आणि त्यांच्या साथीदाराने गंडा घातल्याचे तपासात समोर येत आहे.

तपासासाठी कानपूर पोलिसांचे स्वतंत्र एसआयटी पथक

पोलिस सहआयुक्तांच्या सूचनेनुसार एसआयटी स्थापून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. एसआयटीचे नेतृत्व एसीपी सिसामाऊ वेता कुमार करीत आहेत, ज्यात निरीक्षक बजारिया अजय कुमार सिंग आणि चार उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

संशयित देश सोडून पळून जाऊ नये म्हणून सर्वत्र खबरदारी

शिवाय हे तिघे संशयित देश सोडून पळून जाऊ नयेत यासाठी त्यांची छायाचित्रे दिल्ली, मुंबई आणि लखनऊ विमानतळ व्यवस्थापनाला पाठवण्यात आली आहेत. नेपाळ सीमेवरही या आरोपींबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोन्याच्या बदल्यात बोगस धनादेश

कानपूर येथील फसवला गेलेल्या सराफी व्यवसायिक आयुब यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडून अंदाजे दीड कोटी रुपयांचे २ हजार ६०० ग्रॅम सोने घेऊन हे तिघे फरार झाले आहेत. सध्या सोन्याचा चांगला भाव पाहून त्याना प्रॉपर्टी खरेदी करायची होती त्यासाठी त्यांना ते सोने विकायचे होते. संपतराव याने त्यांच्या असहायतेचा फायदा घेत २ हजार६०० ग्रॅम सोने घेतले. त्याबदल्यात त्यांना २९ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले, जे वटलेच नाहीत.

विटा पोलिसांकडून दुजोरा

सांगली जिल्ह्यातील पलूस आणि खानापूर तालुक्यात उत्तर प्रदेशातील कानपूर येथील पोलिसांचे विशेष पथक दाखल झालेले आहे. या पथकात अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण ११ जण असून परवा ६ डिसेंबर बुधवार पासून हे पथक खानापूर तालुक्यातील बामणी आणि पलूस तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन कसून चौकशी करीत असल्याची माहिती विटाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news