पुणे

आदराने गप्प बसलोय वळवळ करू नका : शरद पवारांवर अजित पवारांची टीका

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मी आदराने तोलून मापून बोलतोय, तोंड उघडायला भाग पाडले, तर फिरता येणे मुश्कील होईल. गप बसलोय म्हणून वळवळ करता का? या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर निशाणा साधला. ते बारामतीत राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. शरद पवार यांनी सोमवारी दमबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. त्यावरही अजित पवार म्हणाले, मी दमबाजी केली, तर लोक मला बांबू लावतील. मी दम दिलेला नाही, फार तर मी केलेल्या कामांची त्यांना आठवण करून दिली असेल, तेवढे तर मी करू शकतो ना. मी उगाच बोलत नाही. मनात दुखतेय म्हणून बोलतोय.

बारामतीतील काही लोक केव्हीके, ट्रस्टमध्ये कामाला आहेत. त्यांना आता दमबाजी केली जात आहे. या पद्धतीने बारामतीत कधी मते मागितली गेली नव्हती. पातळी सोडून हे सगळे चाललेय, असे सांगून अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर हल्ला चढवला. ते म्हणाले, संसदेत केवळ भाषणे करून प्रश्न सुटत नाहीत. मी पण भाषणे करतो, पण त्याचबरोबर कामे करून जनतेला रिझल्टही देतो. खासदारांकडून रेल्वेच्या जमीन अधिग्रहणाचे एक काम झाले नाही. शेवटी मी अमित शहा यांना भेटून ते मार्गी लावले.

निवडणुकीच्या निमित्ताने मी पुरंदरमध्ये ज्येष्ठ नेते दादा जाधवराव यांची भेट घेतली. त्यांनी मला आमच्या काकांबद्दलची कटू आठवण सांगितली. वयाच्या 69 व्या वर्षी ते निवडणुकीला उभे असताना काकांनी त्यांच्याबद्दल दोन सभांमध्ये बैल म्हातारा झाला आहे, त्याला बाजार दाखवा, असे वक्तव्य केले. जाधवराव म्हणाले, मी शरद पवार यांना दैवत मानत होतो, पण त्यांनी माझ्याबद्दल या शब्दात केलेल्या वक्तव्यामुळे मला दुःख झाले. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे, असे अजित पवार म्हणाले. एकदा फॉर्म भरल्यावर बारामतीत शेवटची सभा घेत होता ना; मग आत्ताच गावोगावी फिरायची वेळ का आली? असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT