पुणे : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या उन्हाळ्यामुळे आइस्क्रीम, थंड पेय उत्पादकांसह यात्रा-जत्रांमुळे साखरेस मोठी मागणी राहते. त्याचा विचार करता घोषित कोटा समतोल असला, तरी मागणी वाढताच साखरेचे दर तेजीकडे झुकण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून सोमवारी सायंकाळी वर्तविण्यात आला.
केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी 21 लाख 50 हजार मे. टनाएवढा साखरेचा कोटा खुला केला आहे. देशभरात साखरेचे मुबलक उत्पादन आणि शिलकी साठे आहेत. फेब्रुवारी महिन्यातील 28 दिवसांसाठी 21 लाख मे. टनांचा कोटा खुला करण्यात आला होता. मागणी कमी राहिल्याने साखरेचे दर किंचित मंदीत राहिल्याचे चित्र घाऊक बाजारपेठेत दिसून आले. फेब्रुवारी महिन्यातील शिल्लक साखर कोटा विक्रीस मार्च महिन्यात मुदतवाढ देण्यात आलेली नाही.
मार्च महिन्यापासून साखरेच्या खपात दरवर्षी वाढ होत असते. वाढत्या उन्हाळ्यामुळे सर्वच ठिकाणांहून साखरेस मागणी चांगली राहते. तुलनेने केंद्राने दिलेला साखरेचा खुला कोटा हा मागणीच्या तुलनेत समतोल आहे. असे असले तरी मागणी वाढताच साखरेचे दर वधारण्याचा अंदाज घाऊक व्यापार्यांनी वर्तविला. सोमवारी एस 30 ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर 3375 ते 3400 रुपयांवर स्थिरच होता. मात्र, महाशिवरात्रीसह आगामी होळी, धूलिवंदन, रंगपंचमीच्या सणामुळे मागणी चांगली राहण्याचा अंदाज असून एकूणच साखरेच्या दरात किंचित वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.