पुणे

लहानगे व्हायरल फिव्हर, आय फ्लूने बेजार !

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. यंदा पावसाळ्यात विषाणुजन्य संसर्गांमध्ये श्वसनाचा त्रास, सर्दी, फ्लूसारखे आजार, पोटदुखी, अतिसार, डोळ्यांच्या संसर्गाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कला, सर्दी, जुलाब, उलट्या, अंगदुखी, डोकेदुखी, अन्नावरील वासना उडणे, अशा तक्रारी घेऊन अनेक बालरुग्ण उपचारांसाठी येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शाळकरी मुले दिवसभर एकमेकांच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.लहान मुलामध्ये 99 ते 104 अंश फॅरेनहाइटपर्यंत ताप वाढत असल्याचे दिसून येत  आहे. लहान मुलांना संसर्ग झाल्यास पालकांनी तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुरोगतज्ज्ञ 
डॉ. वृषाली बिचकर म्हणाल्या, 'न चुकता फ्लूचे शॉट्स देणे, नियमित लसीकरण, हातांची स्वच्छता, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकणे, मास्कचा वापर, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा, आजारपणात मुलांना शाळेत पाठविणे टाळा, मुलांचे हायड्रेशन आणि न्यूट्रिशनचा समतोल राखणे आवश्यक आहे तसेच संसर्ग होऊ नये म्हणूनदेखील पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.'
डेंग्यू वाढतोय…काळजी घ्या…
पावसाळ्यात अनेक प्रकारचे जंतू आणि संसर्ग आढळून येतात. पालकांनी मुलांना आजारांना बळी पडण्यापासून वाचविणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या ऋतूतील वाढत्या आर्द्रतेमुळे जंतूंची संख्या वाढते. पुण्यात काही दिवसांपासून डेंग्यूची साथ वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात जागोजागी पाण्याचे डबके साचलेले असते. त्यामध्ये घाण पाणी साचून राहते. त्यामुळे कॉलरा, टायफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांची लागण होते. ताप येणे, डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे अशी लक्षणे आढळून आल्यास पालकांनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. मुलाला सर्दी, ताप, खोकला असल्यास तीन ते चार दिवस शाळेत पाठवू नये.
                                                                                              – डॉ. इरफान पल्ला, बालरोगतज्ज्ञ 
हेही वाचा :
SCROLL FOR NEXT